३१ जुलै, २०१०

बातम्या

अरारा..हा ब्लॉग बंद होण्याची चिन्हे दिसत नाहीत. जगात काहीतरी घडणार आणि मला त्यावर काहीतरी म्हणावेसे वाटणार. आता या दोन बातम्याच बघा:

वारंवार शरीरसंबंध बलात्कार नाही - कोर्ट
राहुल महाजनने पत्नीला बेदम मारले
(सौजन्य: अर्थातच म.टा. असल्या पाणचट बातम्या आणखी कोण देणार!)
याच कोर्टाने (आणि न्यायाधिशांनीही) काही दिवसांपूर्वीच लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवले, तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही असा निकाल दिला होता. आता आम्ही काय बुवा कायदा पाळणारी माणसं. मग दिली आम्ही पण आमच्या परिचयातील सगळ्या मुलींना लग्नाची वचनं ! (हॅट...काही घडलं नाही तसं....मुली हुशार आहेत कोर्टापेक्षा)
पण कोर्ट तरी काय करणार हो. मुळात शरीरसंबंध ही एवढी फालतू न क्षुल्लक गोष्ट आहे की त्यासाठी कोर्टात जायची गरज नाही. रात गई, बात गई. आणि कोर्टान जरी बलात्कार झालाय असा निकाल दिला तरी हे दोघं काय पुन्हा कधी शरीरसंबंध करू शकणार नाहीत का? तर आम्ही यातून एवढाच बोध घेतो की असल्या आलतू-फालतू गोष्टीसाठी कोर्टात जायचं नाही. काय एकमेकांची डोकी फोडायची ती घरातल्या घरात, किंवा बाहेरल्या बाहेर. कोर्टाला जणू काही कामधंदाच नाही मानवी पागलपणाचे खटले ऐकण्याशिवाय. मुळात आमचा प्रश्न असा आहे की, तुम्ही जर एवढ्या सहज आमिषाला बळी पडून शरीरसंबंध ठेऊ देता, आणि पुरूष पलटला तर कोर्टात जाता, तर याच कोर्टात काय पण प्रत्यक्ष ब्रम्हदेवाच्या कोर्टातही तुम्हाला न्याय मिळायचा नाही. कोर्ट बलात्कार झाला नाही असे म्हणत असल्याने आता स्त्री संघटनाही नाराज झाल्यात (आय अ‍ॅम सॉरी, मराठी भाषा अशीच आहे). आम्ही समजू शकतो. त्यांचा रेफरंस पॉईंट दुसरा आहे. या निकालामुळे आमच्यासारखे कामसू लोक लग्नाची वचनं देऊन मोकाट सुटणार नाहीत काय? खरंय. तर मायबहिणींनो, तुम्हाला एवढंच सांगतो की शब्द, वचन ही अत्यंत पोकळ गोष्ट आहे. प्रॉमीसेस आर मेड टू बी ब्रोकन ! अरे सांगा रे यांना कुणी पुस्तकं वाचायला! आणि पुन्हा हे एका पुरूषाला सांगावा लागतंय.

आणि ही दुसरी बातमी:-
राहुल महाजनने पत्नीला बेदम मारले.
आमचा शेजारीही त्याच्या बायकोला बेदम मारतो - ती पण त्याला जामून ठोकते. ही बातमी ज्यावेळपासून त्या दोघांनी ऐकलीय, त्यावेळपासून ते माझ्या घरातून हलायला तयार नाहीत. आमचंही नाव पेपरमध्ये छापून यायला पाहिजे म्हणे. आमच्या भांडणाची व्हिडीओ शुटींग करून घ्या आणि ती चॅनलवर दाखवा म्हणाला. त्याला हरप्रकारे समजावून सांगितले की बाबा त्याचं नाव छापून येतंय कारण तो एका स्वर्गीय माजी केंद्रीय मंत्र्याचा मुलगा आहे. त्यानं टिव्हीवरच, पार मंत्र्या-संत्र्यांच्या उपस्थितीत लग्न केलंय - म्हणून त्यांच्या मारामारीच्या बातम्या पण टिव्ही पेपरांतून येतात. तुम्ही जशी मारामारी केली की लग्नाला उपस्थित असलेले लोक तुमच्या घरी तुम्हाला समजावून सांगायला येतात (आणि पुन्हा घरी जाऊन बायकोला ठोकतात) ना, तसंच समज. काही केल्या मानेच ना. काहीतरी कराच म्हणे. मग काय खरडली ही नोंद आणि दिली दाखवून त्याला. तेव्हा कुठे आता त्यांच्या घरातून नेहमीसारखा प्लेटस, खुर्च्या फेकल्याचा आवाज येतोय. चला, मला त्यांना समजून सांगायला हवं.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा