१८ जुलै, २०११

झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये - १

- यशवंत कुलकर्णी

सत्तरच्या दशकात उठलेले रजनीश नावाचे वादळ आता जवळपास विस्मरणात गेले आहे. यापूर्वी मी लिहिलेल्या यु. जी. विषयीच्या लेखमालेत रजनीशांचा जरुरीपुरता आढावा घेतला आहे. पण हा विषय तेवढ्यात संपणारा नाही. म्हणून मुद्दाम रजनीश हा विषय ठरवून लिहिलेली ही लेखमाला लिहिण्याचे योजिले आहे. विविध पैलूंतून रजनीश उलगडून समोर मांडण्याचा, आणि कोणताही आरोप न करता, या माणसाचा धूर्तपणा, त्याची खरोखर पोहोच कुठवर होती हे खुद्द वाचकांनाच दिसावे असा प्रयत्न आहे.
रजनीश कोण होते, त्यांनी भारतात व अमेरिकेत काय भानगडी केल्या, त्यांच्या बुद्धीची झेप किती मोठी होती वगैरे तपशीलात जाण्याचे कारण नाही. रजनीश उदो उदो करणारे व रजनीश मुर्दाबाद छाप साहित्य आंतर्जालावर उपलब्ध आहे.
त्यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपासून (पुंगलिया बंधू, टिंबर मार्केट) पुण्यात व भारतभरात दिलेली व्याख्याने (जवळपास ४००० तासांचे रेकॉर्डिंग), बरीचशी पुस्तके, अमेरिकेत पत्रकारांना दिलेल्या मुलाखती आणि अमेरिकेतून हकालपट्टीनंतरची व्याख्याने हे सगळे मी ऐकले, चित्रफितीवर पहिले आहे.
त्यांचे साहित्य आणि वाणी आवडत होती, प्रभावीतही झालो होतो. रजनीश कसे बरोबर आहेत आणि जग त्यांना ओळखण्यात कसे चुकले आहे हे सांगणारे लेखही सकाळ व लोकमत मध्ये मी लिहिले. इथल्या ओशोप्रेमींच्या ध्यान शिबिरातही मी अनेकवेळा गेलो – व नंतर ध्यान करू लागलो. एवढं, की मला नोकरी सोडून दोन वर्षे फक्त ध्यानासाठी द्यावी वाटली. एवढ्यासाठीच हे तपशीलवार सांगत आहे की, नंतर नीट अभ्यास न करता काहीबाही लिहिल्याचा आरोप होऊ नये.
मी रजनीश ऐकत होतो पण कुठेतरी खोलवर हा माणूस फसव्या आहे, हा भासवतो तसा पूर्ण पारदर्शक बिलकुल नाही हे नेहमी वाटायचं, पण अगदी किंचित, ओझरतं. कदाचित आपणच समजून घेण्यात चुकत असू असं मानून ध्यान करीत होतो. पण ध्यानात जस-जसा खोलवर जाऊ लागलो तस-तसा या माणसाचा खरा चेहरा दिसू लागला.
मला जे तथाकथित समाधीचे अनुभव आले तेव्हा मी हादरून गेलो. ध्यानात एका उन्मुक्त भावावास्थेच्या क्षणी मी दशदिशांना विस्तारलो आहे ही जाणीव होत असतानाच “आता पुढे काय” हा मनात चाललेला विचार मला सुस्पष्टपणे दिसू शकत होता! विचार थांबल्याशिवाय समाधीप्रवेश होतच नाही या समजाला धक्का बसला होता. सविचार समाधीही असते हे लक्षात आले.  
 तरीही या माणसाचे फोटो फेकून देऊन पुस्तके जाळून टाकण्याचे धैर्य माझ्याकडे नव्हते, हे मुद्दाम नमूद करतो. ते धैर्य ते युजी वाचल्यानंतर आले. रजनीश गेले आणि युजी आले असे नाही. दोघेही गेले.    
  अजूनही कुठेतरी वाटत होतं की, नाही प्रत्येकाची व्यक्त होण्याची पध्दत वेगळी असते – शेवटी सत्य एकच आहे. रजनीश कसेही असोत, त्यांना ऐकले म्हणून आपण ध्यान करू लागलो हेच मोठे उपकार आहेत. पण या समजुतीआड मला दिसलेले रजनीश कसे ते लिहिणे राहून जात होते.    



   
अज्ञाताचे भांडवल
जागृत झालेल्या माणसाला सगळेच ज्ञात असते – काय वाट्टेल त्यावर तो बोलू शकतो व ते पूर्णतः सत्य असते असा एक सर्वसाधारण समज असतो. असा माणूस व इतरेजन यांच्यातील फरक म्हणजे आध्यात्माच्या वाटेवर चालून कुठेतरी पोहोचलेला तो, त्या विषयातील अनुभवांमुळे ज्ञानी. बाकी सर्व अज्ञानी अशी सर्वमान्यता. वरून पुन्हा तो लोकांना ज्ञान विसरण्याची शिकवण देत असतो! त्याला काहीतरी जगावेगळे मिळालेले असते किंवा तो स्वत:च ते जे काही असेल त्यात हरवलेला असतो. किंवा असूनही शिल्लक उरलेला नसतो. इतरांनाही तसे कसे होता येईल हे तो सांगत असतो. एकीकडे अज्ञानी होण्याची शिकवण देताना तो त्याच्या ज्ञानाचा घडा आपल्या डोक्यावर बदाबदा ओतत असतो. ही अज्ञातातील उडी असते, हेच अज्ञाताचे भांडवल असते. हे अज्ञाताचे भांडवल रजनीशांना जन्मभर पुरले. जागृत झाल्याचा जो दावा करील तो हमखास स्वत:ची फसवणूक करीत आहे असे समजा हे रजनीशांनी सांगितले होते. आणि ते जागृत झाल्याचा दावाही त्यांनी स्वत:च केला होता! आडवे-तिडवे प्रश्न विचारणारास त्यांचे सरळ सांगणे असे – “तुम्ही जागृत आहात तर इथे कशाला आलात, जागृत नसाल तर माझे ऐकून घ्या.. आणि मनात समर्पण जन्मू द्या...”  
त्यांनी जगभरात होते नव्हते तेवढे सर्व सद्गुरू उकरून काढले व त्यांच्या साहित्यावर रसाळ व उद्बोधक व्याख्याने दिली. जे. कृष्णमूर्ती व यु.जी. कृष्णमूर्ती या समकालीन जागृत पुरुषांची मात्र चुकुनही भेट घेतली नाही.




(क्रमश:)

२ टिप्पण्या: