शेरलॉक होम्स हा विषय बर्याच दिवसांपासून मनात घोळतो आहे. विषय इंटरेस्टींग आहेच; त्याबद्दल असंख्य ठिकाणी छापून, लिहून आलेलं वाचूनसुद्धा शेरलॉकबद्दल मला लिहावं वाटत आहे - सखोल कायसं म्हणतात ते करायचा भुंगा डोक्यात गुईंगुईं करतोय. म्हणजे आंघोळ करताना नाही का एका कानात पाणी जातं आणि कितीही काही केलं तरी कानात सुईंफूईंबीईंईं असा आवाज चालुच राहातो तसं. हो..हो..शू:क्क्क्क..विषय गंभीर आहे..हे आवाज बिवाज बास आता. पण थोडंसं बेअरींग येई पर्यंत असे आवाज काढावे लागतात - तंबोरा तबला जुळवताना ते वाजवणारे पहिल्यांदा अर्धा-पाऊण घंटा बेजार होतात ना तसं. ह्याट!! साला अजून एक किस्सा सुचला या तंबोरा-तबल्यावरून. आज शेरलॉकचा उध्दार होणार नाही असं दिसतंय. पण थोडक्यात आवरतो. बर्याच लोकांनी वाचलाही असेल. इंग्रजी अमलात एका नवाबानं व्हाईसरॉयच्या स्वागतासाठी मैफिल ठेवली. ते आले सगळे, वाजणारे - गाणारे आणि सुरू केली त्यांनी आपापली वाद्यं एका ताला-सुरात लावायला. टंग..ठॉक.. ठॉक..दुडडुम्बाक...थँक...ढिगांग...हे चालू असताना नवाबानं व्हाईसरायला सहज अदब म्हणून विचारलं कोणत्या प्रकारचं संगीत ऐकायला आवडेल आपल्याला? व्हाईसरॉय गडबडला. त्याला काही माती कळत नव्हतं भारतीय संगीत काय असतं ते. तो म्हणे हे काय, हे टंग..ठॉक.. ठॉक..दुडडुम्बाक...थँक...ढिगांग... हेच मस्त वाटतंय...हेच वाजवा. आता नवाब तो नवाब. व्हाईसरॉयला जे आवडतं तेच संगीत. त्यानं वाजवणार्यांना दिला आदेश - तुमचं हेच चालू राहु द्या. आणि ती मैफिल तंबोरे-तबले लावता लावता निघणारे आवाज ऐकूनच पार पडली.
आता ब्रिटीश कालखंडात झालाच आहे आपला प्रवेश तर याच वाटेनं थोडं पुढं २२१बी, बेकर स्ट्रीट, लंडन इथं जाऊया. जगातील इंग्लिशच्या जवळपास सर्व वाचकांना शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसनचा हा पत्ता माहित आहे. सर आर्थर कॉनन डॉयल या लेखकानं १८८७ साली पहिली डिटेक्टीव्ह कथा प्रकाशीत केली. शेरलॉक होम्ससुध्दा स्वत:ला जगातला पहिला "कन्सल्टींग डिटेक्टीव्ह" म्हणवतो. इंग्लंडमधील रेल्वे पटरीवर धावायला लागून पंच्याऐंशी वर्षे उलटली होती, स्टेशनबाहेरच्या दगडी-चिर्यांच्या रस्त्यावरून व्हिक्टोरिया बग्ग्यांची खडखड करीत ये-जा चालु होती. एव्हाना तारयंत्रेही वेळेवर आणि हव्या त्या माणसाला तारा पाठवू लागली होती, बर्हिवक्र भिंगातुन सुध्दा बरेच काही दिसत होते आणि सॅम्युअल कोल्टच्या रिव्हॉल्व्हर्स वापरून इंग्रजांचा नेमही बराच सुधारला होता. स्कॉटलंड यार्डच्या कर्कश्श शिट्ट्या वेळी अवेळी ऐकू येत होत्या; शिवाय टाईम्स, मॉर्निंग पोस्ट, ऑब्झर्व्हर इ. सारखी वृत्तपत्रेही योग्य त्याच आणि वेळच्या वेळी बातम्या छापत होती. औद्योगिक क्रांतीतून पैदा केलेला माल घेऊन इंग्रजी जहाजं जगाच्या कानाकोपर्यात ये-जा करीत होती. जगभरातील छोटे-बडे राजे रजवाडे, राण्या लंडनमध्ये चकरा मारत होत्या; लंडनच्या गुढ गंभीर वाटणार्या पेढ्या जगभरातील हिर्या-माणकांनी बहरून गेल्या होत्या. सेशन्समध्ये असणारे कोर्ट खून-बलात्कारातील गुन्हेगारांना पंधरा दिवस-महिनाभराच्या आत फासावर लटकावण्याचा हुकूम पास करून कचाकच पेनांची निबं तोडत होते. आर्थर कॉनन डॉयल हा डॉक्टर पहिल्यांदा भारतात येऊन अफगाण युध्दात जेझाईल बुलेट खाऊन लंडनच्या धुकेजलेल्या हवेत परत गेला होता.
चुकांच्या दुरूस्त्या: १. सर ए.सी. डॉयलची पहिली डिटेक्टीव्ह कथा १८८७ साली प्रसिध्द झाली. त्याचा जन्मच १८५९ चा आहे; तो काय १८५७ मध्ये कथा लिहीणार. माझी नजरचूक.
२. सर ए.सी. ने पहिली डिटेक्टीव्ह कथा लिहीली तेव्हा रेल्वे धावायला लागून पंच्याऐंशी वर्षे झाली होती.
अजूनही काही असतील तर कृपया दाखवा; दुरूस्त करू.
छायाचित्रे: मायाजालातून साभार.
last paragraph is exact summary of whole Homes...
उत्तर द्याहटवा!