१९ ऑगस्ट, २०१०

शेरलॉक होम्सचे जग: भाग २

मागच्या पोस्टमधील शेवटचा परिच्छेद वाचुन मी इथं शेरलॉक होम्सच्या डिटेक्टीव्ह  कथांचे रसग्रहण लिहीत आहे असा समज होण्याची शक्यता आहे.  लिखाण पुढे जाईल तसं अगदीच आवश्यकता असेल तेव्हा ते घडेलच; पण रसग्रहण करून देण्यावर माझा विश्वास नाही.  रसग्रहण म्हणजे आपल्या वाट्याला आलेल्या रसातून दुसर्‍याला कनेक्शन देण्यासारखे वाटते; तो रस कितपत दुसर्‍यापर्यंत जातो देवजाणे. कदाचित यामुळेच रसग्रहण छाप पुस्तके निरस वाटतात. माझा इंटरेस्ट आहे तो सर ए.सी. डॉयल (अंशत:) शेरलॉक, त्याच्या भोवतीचे जग, त्याकाळची इंग्लिश भाषा, काही प्रमाणात इंग्रजांचे रितीरिवाज यांची उचक-पाचक करणे यात. कारण शेरलॉकच्या सर्व गूढकथा याच जगात उगवल्या होत्या. शेरलॉक हे एक पात्र आहे -  त्यात ओतलेला ए.सी. डॉयलचा मेंदू महत्वाचा आहे -  यातून निष्कर्ष वगैरे देखील काही काढायचा नाही - मी फक्त शेरलॉक होम्सच्या गूढरम्य रानातून येढा करायला निघालो आहे. येढा करणे म्हणजे सहज शिवारातून आजूबाजूचे पीक-पाणी, पक्षी, झाडे-वेली पाहात-पाहात एक चक्कर टाकणे. तशी ही चक्कर आहे. थोडक्यात शेरलॉकचे जग हे निमित्त आहे आणि मी इथं माझी अक्कल पाजळतोय. 

मागच्या पोस्टमध्ये शेवटच्या परिच्छेदात जी शब्दांची जमवाजमव केली आहे ती फक्त त्याकाळच्या सुसंघटीत, सूत्रबध्द आणि फुल्ली नेटवर्क्ड इंग्लिश जगताची एक  किंचीतशी झलक आहे. ए.सी. डॉयलने मांडलेले ते पुस्तकी जग वाचताना दुवे कसे फटाफट जुळतात -  ए. सी. डॉयलने मांडलेले जग ही त्याकाळच्या इंग्लिश जगताची एक सुंदरशी झलक आहे. हे इंग्लिश लोकच मुळात सुव्यवस्थित, कायदेकानू करणारे आणि केलेल्या कायद्याला सार्थकी लावणारे, शिस्त बाळगणारे. काहीवेळा अतिरेक होतो; पण शिस्त मस्त असते.  बोअर झालं. अर्थातच एक किस्सा सांगावा लागणार. टायटॅनिक चित्रपटात जहाज बुडताना लिओ डी’कॅप्रिओला सेलरमध्ये नेऊन पाईपला बांधलेले असते. केट विन्स्लेट त्याला शोधत येते. त्याला हातकडी घालून पाईपला अडकवलेला असतो. केट कुर्‍हाड शोधून आणते आणि हातकडी तोडायला धावते. तो तिला आधी लाकडी टेबलावर कुर्‍हाड सरळ मारण्याची प्रॅक्टीस करायला लावतो. दोन-तीनदाच. तिकडे जहाज फुटलेय. माणसं मेलीत. यांच्याही गळ्यापर्यंत पाणी येतेय आणि हा बाबा तिला म्हणतोय कुर्‍हाड आधी सरळ मारायला शिक, मग हातकडी तोड. ती तसे करते आणि हातकडी तोडते. हे भारतात होणे शक्य नाही! भारतीय माणूस म्हणाला असता - हाण कसाही धडाका, हात तोड! पण लवकर सोडव ! भारतीय (आणि त्यातल्या त्यात मल्लू - मगधीरा!!!) हिरो-बीरो असता तर तो बुडते जहाज घेऊनही आकाशात उडाला असता हा भाग अलाहिदा !
तर पुन्हा एकदा ट्रॅकवर येतो.  शेरलॉकच्या कथांतून आपल्या मनाची पकड घेणारे सुसंघटीत, सूत्रबद्ध आणि फुल्ली नेटवर्क्ड जग ही ए.सी. डॉयलची काल्पनिक निर्मिती आहे; पण त्याची ही काल्पनिक निर्मिती हिंदी सिनेमासारखी बेफाट नाही. ती तर्काच्या कसोटीवर खरी उतरूनही सत्य शोधल्यानंतर तर्काला चारीमुंड्या चीत करणारी आहे. शेरलॉकचीच वाक्ये घेतो:-
It was easier to know it than to explain why I know it. If you were asked to prove that two and two made four, you might find some difficulty, and yet you are quite sure of the fact.
(मला कसे समजते हे विश्लेषण करीत बसण्यापेक्षा ते समजण्याची प्रक्रिया सुगम असते. तुम्हाला दोन आणि दोन चारच का होतात हे सिध्द करायला सांगितले तर अवघड होईल, पण दोन आणि दोन चारच होतात हे सूर्यप्रकाशाइतके सत्यदेखील असते - ए.सी. डॉयलच्या कथांचाच नव्हे तर जगातील सर्व गुढातिगुढांचा (यात तथाकथित भारतीय आध्यात्मिक गुढे देखील आली) डोलारा या सूत्रावर उभा आहे - बाकी जे आहे तो सगळा रंगीत, निव्वळ चटकदार तपशील आहे - आणि एका ठराविक मर्यादेनंतर तपशील कितीही रंगीबेरंगी, चटकदार असो तो रंगहीन होतो; निरस होतो )

I never guess. It is a shocking habit — destructive to the logical faculty. 
(मी कधीच अंदाज लावत नाही. ती बेकार सवय आहे - ती सरळ सत्यापर्यंत घेऊन जाणार्‍या तर्काच्या मार्गावरून कल्पनांच्या जंगलात घेऊन जाते)

डिटेक्टीव्ह कथांचे सोडा, आपले रोजचे दैनंदिन आयुष्य नुसते अंदाज लावत बसण्यात, आणि आपणच गेस केलेल्या गोष्टींभोवती गोल-गोल फिरण्यात उलटते. कल्पना काहीतरी वेगळीच असते आणि रिअ‍ॅलिटी अगदीच वेगळी - आपण रिअ‍ॅलिटीपासून कोसो दूर - कल्पनांच्या जंगलात वाट चुकलेलो असतो. पुढं मग आपण निर्माण केलेली कल्पना खोटी ठरली की आदळआपट, आपली कल्पनाच कशी खरी आहे हे सिध्द करण्याचा अतोनात आटापिटा - आणि वेळोवेळी सत्यतेच्या आसूडाचे फटके खाणे.  एकतर सत्यतेला सिध्द होण्याची काही गरज नसते - जो माणूस सत्यतेला सिध्द करू पाहातो तो अर्थातच भटकलेला असतो - मुळात माणूस सत्यता सिध्द करीत नसतो तर तो स्वत:ला सिध्द करीत असतो. त्यामुळे सत्य स्वयंसिध्दच असते, ते तसेच राहाते आणि माणसे उलटतात - संपून जातात. उदा. आत्ताच माझ्या मैत्रिणीचा एसएमएस आला आहे- "अरे झोपला आहेस का?" आता मी झोपलेलो असेन तर उत्तर देणार नाही आणि ती समजून जाईल की मी झोपलो आहे - हा साधा तर्क आहे, सत्यतेपर्यंत घेऊन जाणारा आहे. पण इथेच जर कल्पना मध्ये तडमडली तर "झोपलाच असेल कशावरून? मुद्दाम उत्तर देत नसेल तर? " की झाली बेजारी सुरू तिकडं. आता मी झोपलेला नसून इथे ही पोस्ट टाईप करतोय ही रिअ‍ॅलिटी आहे.  उत्तर आलेले नाही त्याअर्थी झोपला आहे हे समजणे तिच्यासाठी मानसिकदृष्ट्या फायदेशीर आहे.  हे विश्लेषण मनोरंजक नाही. थांबतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा