६ डिसेंबर, २०११

येळकोट येळकोट जय मल्हार

गावाकडच्या बाजारात कांदे वांगे दिसायला सुरुवात होऊन दोन-चार आठवठे झाले तरी घरात मात्र ते आणले जात नसत. कारण सट (चंपाशष्‍ठी) अजून झालेली नसे ना.
खंडोबा ज्यांचं कुलदैवत आहे किंवा ज्यांच्या देवघरात खंडोबाचे टाक आहेत त्या सगळ्यांच्याच घरात हा रिवाज पाळला जात असावा. आमच्या घरात आजी लग्न होऊन येत असताना तिच्यासोबत तिचं कुलदैवत असलेला खंडोबाही (टाक) आला होता. तेव्हापासून आमच्याकडेही सट पाळली जाऊ लागली असावी; निश्चित माहिती नाही कारण विचारायला सध्‍या जवळ वडीलधारं कुणीच नाहीय.
खंडोबा हे तसं धनगरांचं कुलदैवत. पण श्रद्धेला बंधन नसतं.
तर ही सट म्हणजे काय आणि ती आमच्या गावाकडे कशी साजरी होते त्याचा हा फोटो वृत्तांत.
चंपाशष्‍ठीपूर्वी आठ दिवसांपासूनच गावातले धनगर गडी खंडोबाच्या देवळात 'वारु' म्हणून बसलेले असत. खंडेराया, माझं हे कामं होऊ दी, म्होरल्या साली तुझा वारु म्हनून सेवा करीन असा नवस खंडोबासमोर बोलला आणि ते विविक्षीत काम झालं की वारु म्हणून बसणं आलंच. 
 
मग वारु म्हणून बसलेल्या लोकांचं सट होईपर्यंत पुजा-अर्चा, खाणं-पिणं, रहाणं सगळं खंडोबाच्याच मंदिरात. बाजाराचा दिवस म्हणजे बुधवार सटीच्या दिवशी येईल अशा बेतानं गावात हे वारु गाड्या ओढतात. या वारुंच्या अंगात आलेल्या खंडोबाकडून श्रद्धाळू धनगर आणि इतरही लोक चाबकाचे फटके खातात.
सटीच्या दिवशी मग आजीकडून मल्हारी मामा नावाच्या एका धनगर आजोबाला बोलावणं जाई. नैवैद्य-वैश्वदेव झाल्यानंतर खंडोबाची तळी उचलायची असे. हे मल्हारी मामा मग त्यांच्यासोबत तळी आणि खंडोबा समोरच्या दिवट्याच्या काजळानं काळा कुळकुळीत झालेला विळा घेऊन घरी येत. तळीसमोर आरती झाली आणि ती विधीपूर्वक ती उचलली की विळ्यावरचं काजळ घरातल्या पोरासोरांच्या आणि गडी माणसांच्या डोळ्यांना लावलं जात असे.
जेवणं उरकली की खंडोबाकडं पळायचं असे. गावभरातल्या बैलगाड्या खंडोबासमोर आणून ओळीनं एकामागे एक लावल्या जात. ओढताना मध्येच सुटु नये म्हणून त्या दोन्हीकडून सोलीनं पक्क्या बांधल्या जात. पार भोईवाडा, आखरापासून (गावचं मैदान) ते खंडोबाच्या पायरीपर्यंत या गाड्या ओढल्या जातात. 'येळकोट येळकोट जय मल्हार' च्या जयघोषानं आसमंत दणाणून जाई आणि गाड्यांमध्ये बसायला पोरासोरांची झुंबड उडालेली असे. एरव्ही वर्षभरात कधीही जागा न बदलणारा बाजार सटीच्या दिवशी मात्र खंडोबाकडं भरलेला असे. वारु गाड्या ओढत असताना त्यात बसण्यात, वारुकडून माणसं कोरड्याचे फटके खाताना बघण्‍यात थरार असे. वर्षभरात चुकून हुकून घडलेलं पाप खंडोबाच्या कोरड्यानं फटके खाल्ले की धुवून निघतं असा समज. गावातले जख्ख म्हातारे झालेले धनगरही बाह्या सरसाऊन सुरकुतलेले हात अंगात आलेल्या आणि कोरडा घेऊन झुलणार्‍या वारु समोर धरायचे.. हातात धरायच्या ठिकाणी घुंगरं बांधलेला कोरडा रप्पकन त्या हातांवर पडायचा आणि रक्ताच्या चिळकांड्या उडायच्या. जास्तीत जास्त पाच कोरडे हातावर घेतले की माणूस खंडोबा अंगात आलेल्या वारुच्या पायावर लोटांगण घेत असे..  किंवा फारच श्रद्धाळू असला की कोरडे खाणाराच्याच अंगात येऊन तो तसाच गर्दीत झुलत राही.. मग चार-दोन लोक पुढे येऊन रक्ताळलेल्या हातांवर खंडोबाची हळद भरीत..
नगरप्रदक्षिणा व देवदर्शनासाठी निघालेले वारु


नगरप्रदक्षिणा



प्रत्येक वारुला गाडी ओढावी लागते, प्रत्येक वेळी खंडोबाची आरती होते
From



खंडोबाची आरती



गाड्या ओढल्या जात असताना


गाड्या ओढल्या जात असताना


खंडोबा अंगात आलेले वारु कोरड्यानं स्वतःलाही झोडपून काढतात आणि इच्छुकांनाही

१४ नोव्हेंबर, २०११

शब्दावेगळे


यु. जी. कृष्‍णूर्तींचे साहित्य वाचताना त्यांच्या रूपांतरणोत्तर आयुष्‍यात घडलेल्या एका अगदीच सूक्ष्‍म पण अत्यंत महत्त्वाच्या फरकाचा उल्लेख येत रहातो. हा अगदीच छोटासा फरक 'युजी' हा माणूस आणि बाकीचे जग यांतला कळीचा मुद्दा आहे. कदाचित आध्‍यात्माच्या वाटेवर चालून ती वाट संपवलेल्या सर्वांच्यामधला व बाकी माणसांच्या मधला तो फरक असावा; इतरांचं मला जास्त माहित नाही, पण युजींनी मात्र सतत या फरकावर जोर दिला आहे.
हा फरक म्हणजे शब्द आणि त्यातून निर्माण होणारी प्रतिमा! युजींच्या अंतर्पटलावर शब्दांतून कसलीही प्रतिमा निर्माण होऊ शकत नाही.
थोडक्यात जगाला जाणून घेण्‍यात किंवा जगाबद्दल समजाऊन सांगण्‍यात शब्दांवर त्यांची भिस्त नाही. अर्थात युजी आणि लोकांच्यातला संवाद हा शब्दांच्या माध्‍यमातूनच झाला आहे. पण युजींचे शब्द हे फक्त ते ज्या अवस्‍थेत आहेत तिची झलक त्यांना ऐकणारांच्या मनात उभी रहावी यासाठी मारलेले कुंचल्याचे फटकारे आहेत. पण युजी हे काही शब्दांचे फटकारे मारुन रजनीशांप्रमाणे सुंदर-सुंदर, लोभस चित्रे उभे करु शकणारे निष्‍णात चित्रकार नाहीत. युजींनी केलेला शब्दांचा वापर हा यांत्रिक आहे, तर रजनीशांनी केलेला शब्दांचा वापर हा नितांत कलात्मक आहे - त्यातून सृजनशीलता डोकावते आणि ती आ‍कर्षित करते.
एरव्ही शब्द म्हणजे काय तर, जे आपल्या आजूबाजूला अफाट विस्‍तारलं आहे आणि ज्या अफाट विस्‍ताराची एकच एक, एकसंघ, महाप्रचंड प्रतिमा आहे, त्या प्रतिमेतून फाडून काढलेल्या चिंध्‍या किंवा ती प्रतिमा उभी राहण्‍यासाठी आपण मर्त्य मानवांनी जोडलेली ठिगळे!
त्या महाप्रचंड प्रतिमेला उभं करण्‍यासाठी आपण जोडत असलेली शब्दरुपी ठिगळे आणि चिंध्‍या याच माणसांनी साठवलेलं लेंढार आहेत - या शब्दांच्या लेंढारातून सहज मोकळं होता येत नाही, व ही शब्दरुपी ठिगळे पाहिल्या शिवाय आपल्या मनात कसलंही चित्र उभं राहू शकत नाही.
हा शब्दप्रतिमांचा व्यापार विचारांच्या माध्‍यमातून मनातही अखंड सुरु असतो, बाहेरुनही आपल्यावर त्याचा मारा सुरु असतो आणि आपणही शब्दप्रतिमा लोकांकडे फेकत असतो - थोडक्यात आपण सर्वचजण लाक्ष‍णीक अर्थाने शब्दावडंबर माजवात जगत राहणारे लोक आहेत, आपण शब्दजीव आहोत. शब्दप्रतिमांच्या ठिगळांशिवाय आपलं चालु शकत नाही. शब्दप्रतिमांची ही ठिगळे विशिष्‍ट पद्धतीने जोडणे ही झाली भाषा. पण मुळात शब्द म्हणजे काय त्याच्या खोलात शिरण्‍याचं कारण नाही. कारण शब्द हे फक्त चिन्ह-प्रतिमा आहेत. त्या प्रतिमांचं अस्तित्त्व हेच शब्दांचं अस्तित्व आहे. मनातून प्रतिमा पुसून टाका, शब्द पुसला जातो. शब्दाचा गळा दाबा, मनात कसलीही प्रतिमा उमटू शकत नाही. प्रात्यक्षिकासाठी कुठलाही शब्द घ्‍या. उदा. मुलगा. मुलगा या शब्दातून जी प्रतिमा मनात येते ती फाडून टाकली, ती नष्‍ट करुन पाहिली तर 'मुलगा' हा एक निरर्थक, विनोदी शब्द शिल्लक रहातो! प्रत्येक शब्द असा मनात नष्‍ट करुन नलीफाइड, व्हॉईड केला तर हे लक्षात येऊ शकेल.
शब्दांच्या मागील प्रतिमा छाटून टाकून आपण तेवढ्‍यापुरतं शब्दावेगळे, शब्दमुक्त होऊ शकतो आणि याच शब्दातून निपजणार्‍या विचारांच्या वावटळींतूनही वेगळे होऊ शकतो, पण हे फक्त तेवढ्‍यापुरतंच होता येतं. विचारांचा ब्रम्हराक्षस णआपण त्याच्या शब्दरुपी अपत्यांची कत्तल करुन मारुन टाकू शकत नाही.
शब्द ही आपली शेवटची मर्यादा आहे. शब्द हीच आपली अंतिम सीमारेखा आहे, आपल्यावर ओढलेलं कवच आहे. शब्दांना जर ओेलांडून पुढे जाता आलं तर, शब्दावेगळं रहाता आलं तर कदाचित त्याला मुक्ती किंवा मोक्ष म्हणत असावेत. कदाचि‍त त्यामुळेच आध्‍यात्मात मौन राहून पाहिलं जातं असावं.

२९ ऑक्टोबर, २०११

पेपरातलं काम

कालच्या धाग्याच्या निमित्तानं काही जणांनी वृत्तपत्रातले किस्से लिहायला सांगितले आहे. असे किस्से लिहायला माणूस फिल्डवर, किमान संपादकीय विभागात काम केलेला असावा लागतो. कारण पेपरची भवती न भवती त्याच विभागात होते. मी मात्र माझ्या पहिल्या नोकरीत जाहिरात विभागाचा भाषांतरकार होतो.
आमचा संपादकीयशी संबंध यायचा, पण आम्‍ही केलेल्‍या जाहिराती, जाहिरात संपादकीय मजकुरापुरताच.

रेल्वे, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, असतील-नसतील तेवढी मंत्रालये यांच्यासोबत खंडीभर सरकारी खात्यांच्या निविदा सूचना, शासकीय महत्वाच्या दिवशी येणार्‍या पान-अर्ध्‍या पानाच्या जाहिराती, जाहिरात संपादकीय, झालंच तर दररोजचे मराठीतून हिंदी-इंग्रजीत जाणारे, हिंदी-इंग्रजीतून मराठीत येणारे उठावणे (obiturial), अमुक फ्रेंडशीप क्लब, तमुक शक्तीदायक तेल, आमचे अशीलाचे शिलावर शिंतोडे उडवल्‍याबद्दल अॅड. फलाणे बिस्‍ताणेकडून रजीस्‍टर्ड नोटीस हा सगळा खुर्दा मराठी-हिंदी-इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत करणे हे आमचे काम.

पहिले काही दिवस तर ते लोक माझी थट्टा करीत आहेत असा माझा वहीम होता. का? वाचा -

''भारताच्या राष्‍ट्रपतींच्यावतीने (हे लिहायला लय भारी वाटायचं) आणि त्यांचेकरिता विभागीय नियंत्रक, उत्तर रेल्‍वे, डी.आर.एम. संकुल, तिसरा मजला, गोरखपूर यांच्याकडून उत्तर रेल्वेच्या गोरखपूर विभागात खालील बाबी वास्तविक काम सुरू झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत पूर्ततेसाठी दि.15 नोव्हेंबर 2011 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंत (निविदा प्राप्ती दिनांक) वरील कार्यालयात पोहोचतील अशा रितीने व दि. 30 नोव्हेंबर 2011 रोजी दुपारी 3.00 वाजता (निविदा उघडण्‍याचा दिनांक) त्याच कार्यालयात उघडल्या जाण्‍यासाठी गेल्या तीन वर्षांत प्रत्येकी रु. 15, 00, 000/- लाख (अक्षरी रुपये पंधरा लाख फक्त) निविदा मूल्‍याची अशाप्रकारची किमान तीन कामे निष्‍पादीत केलेल्या व सनदी लेखापरिक्षकाकडून मागील पाच वर्षांपासून वर्षनिहाय उलाढालीचे लेखापरिक्षित ताळेबंद सादर करू शकणार्‍या व डी.आर.एम. गोरखपूर यांच्याकडे नोंदणीकृत असणार्‍या नामांकित व अधिकारप्राप्त कंत्राटदारांकडून नोंदणीकृत टपालाने योग्य प्रकारे मोहोरबंद केलेल्या लिफाफा ''अ'' आणि ''ब'' मध्‍ये (लिफाफा अ मध्‍ये तांत्रिक बोली व लिफाफा ब मध्‍ये किंमत बोली) निविदा आमंत्रित करण्‍यात येत आहेत

.



असल्या करामती मला बिनचुकपणे दिवसाला किमान 4-5 वेळा करुन दाखवाव्या लागायच्या. नमुना म्हणून एक परिच्‍छेद दिलाय.. बाबींचे वर्णन दिले तर पुन्हा तुम्ही मी लिहिलेलं वाचायला शिल्‍लक राहणार नाही ही भीती आहे. रेल्‍वेच्या गोरखपूर भांडारात    पूर्णविरामाचा तुडवडा होता, की तिथल्या आद्य हेड क्लार्कची पूर्णविरामाशी काही जानी दुष्‍मनी होती, की आद्य हेड क्लार्कने लिहिलेलाच ड्राफ्‍ट सुरु ठेवण्‍याची रेल्‍वेची खानदानी परंपरा पुढे सुरु होती हे मला नोकरी सोडेपर्यंत कळालं नाही. बरं एवढ्‍या मोठ्‍या परिच्छेदाला सुटी- सुटी वाक्यं लिहून पूर्णविरामानं तोडायला जावं तर लगेच रेल्‍वे शुद्धीपत्रक मागायची.

सोबत देशपांडे काका नावाचे सिनीयर होते. ते शिक्षणाधिकारी म्‍हणून निवृत्त होऊन सतत 13 वर्षांपासून   भाषांतराचं काम करीत होते. ते सात वाजले की घरी निघायचे... नेमक्या त्यावेळी जाहिरात विभागातून जाहिरात घेऊन कुणी आलं तर सरळ हात जोडून म्हणायचे, ''आता मला माफ करा..''
नोकरीवर रुजू झालो त्या दिवशी त्‍यांनी मला ऑफिसमध्‍ये सगळीकडे फिरवून लोकांच्या ओळखी करून दिल्या. प्रुफ रिडर्स उर्फ मुद्रीत शोधकांची ओळख करुन देताना त्यांनी 'हे आपल्या ऑफिसमधले फार विद्वान लोक आहेत बरं का..' असं ते म्‍हणाल्‍याचं मला आठवतं.
डेस्‍कवर ओळीनं बसलेल्‍या त्या चार-पाच विद्वानांपैकी दोन जण भांडण लागल्‍यासारखं काहीतरी वाचत होते.. आणि त्यापैकी एक कागदावर चुका दुरुस्‍त करीत होता.
पण मी या कामात रूळलो. सगळ्याच जाहिराती रेल्‍वेच्या नसायच्‍या. डिस्‍प्‍लेची जाहिरात असेल तर मजा यायची. जास्‍तीत जास्‍त 2 परिच्‍छेद, एक मथळा, उपमथळा आणि बोधवाक्‍य, ब्रीदवाक्य भाषांतरीत केलं की काम खलास! रेल्‍वेचं Serving Customers With A Smile ''ग्राहकांची सस्‍मित सेवा'' हे मराठीतलं बोधवाक्‍य कुठं वाचलंत तर ती आमचीच करामत आहे.. बरेच भाषांतरकार त्याचं ''हसतमुखाने ग्राहकांना सेवा देतात'' किंवा ''ग्राहकांची स्‍मितसह सेवा'' असलं काहीतरी अचाट करतात.. पण ते काही खरं नाही.

एकदा मात्र खैर झाली. काम करून रात्री घरी गेलो. सकाळी दहा साडेदहा वाजता हपीसचा फोन.
''लवकर ये.. काय लिहीलंस जाहिरातीत कालच्‍या.. लोकांनी अंक जाळलेत आपले क्रांती चौकात..''
गाडी काढून ऑफिसमध्‍ये पोचतोय तो गेटवर पोलीसांची जीप. म्हटलं असेल नेहमीसारखी.
पण पुढं गेलो तर चार-पाच कॉन्‍स्‍टेबल दांडके-बंदुका घेऊन उभे.
वर गेलो.
काल एका महापुरुषाची जयंती होती. नेहमीप्रमाणं केंद्रीय मंत्रालयांच्या दोन अडीच पानं भरून जाहीराती आल्‍या होत्‍या. त्‍या मीच एकट्यानं केल्‍या होत्‍या.
आमचे अंक जाळायला कारणीभूत झालेलं माझं वाक्‍य होतं ''कृतज्ञ राष्‍ट्राची विनम्र श्रद्धांजली!''
हिंदी कॉपीत वापरलेला ''श्रद्धांजली'' हा शब्द मी मराठीतपण तसाच ठेवला होता. तो एकच शब्द. पण आमच्या नेत्याच्या जन्मदिनी  श्रद्धांजली वाहणारा कोण तो शहाणा म्हणून कार्यकर्त्यांनी आमचे अंक जाळले.

टेक्‍नीकली चूक झाली होती.
आमचे जाहिरात व्यवस्‍थापक म्हणे तु कुठेही काही बोलायचं नाही. तुला यातलं काही माहित नाही. थोड्या वेळानं त्यांचा मोर्चा येईल.
ते कार्यकारी संचालकांसोबत बोलतील.   
मी म्हटलं बरं. मला कुठे मार खायची हौस आहे.
माझा या प्रकारातला सहभाग एवढाच.
मी केलेली तीच जाहिरात आमच्या मुंबई आवृत्तीनंही छापली होती. पण तिथं कुणाला काही चूक वाटलं नव्हतं. अंक जाळणं वगैरे तर बिलकुल झालं नव्हतं.
आमच्या अॅड मॅनेजरने तोपर्यंत ''कृतज्ञ राष्‍ट्र की विनम्र श्रद्धांजली!'' ही मूळ हिंदी कॉपी, मी केलेलं ''कृतज्ञ राष्‍ट्राची विनम्र श्रद्धांजली!'' हे भाषांतर दोन्‍ही ताडून पाहिलं होतं. 
मुद्रीत शोधकांशींही त्‍यांचं बोलणं झालं होतं.
अॅड मॅनेजरने काय तो निर्णय घेतला.
कार्यकर्ते आले. त्यांनी संचालकांसोबत चर्चा केली. जयंतीसाठी देणगी स्‍वीकारून ते शांत झाले म्हणे.
भाषांतरकार म्हणून केलेल्या नोकरीत घडलेला हा असला एकच किस्सा.

बाकी किस्से पुन्हा कधीतरी...

९ ऑक्टोबर, २०११

फिल्म दि मेसेज





"दि मेसेज" या चित्रपटाबद्दल बऱ्याच दिवसांपासून लिहिण्याचे मनात होते. प्रेषित मुहम्मद व इस्लामच्या जन्माबद्दलचा हा एक फारसा नसला तरी धाडसी चित्रपट म्हणावा लागेल. माझे खूप मुस्लिम मित्र असूनही त्या कुणाकडूनच कधी या चित्रपटाबद्दल ऐकले नव्हते - पण अचानक मिळून गेला. कथेला नायक असूनही तो शेवटपर्यंत न दाखवलेला कदाचित हा एकमेव चित्रपट असावा. शिवाय या चित्रपटाबद्दल वाद झाल्याने (हो.. वाद होण्याचा किंवा 'घडवण्याचा' मक्ता काय फक्त बॉलीवूडने घेतलाय का) त्यातील प्रसंगांची इजिप्तच्या 'जामे अल अझर' व 'वर्ल्ड शिय्यत कौन्सिल'ने तारीकी सच्चाई केलेली आहे. चित्रपटात कुठेही प्रेषित किंवा त्यांचे नातेवाईक दाखवलेले नाहीत.
विशेष म्हणजे ऊर्दूमध्ये डब झाल्याने या चित्रपटाची मजा आणखीच वाढलेली आहे. ऊर्दू भाषेला तिचे खास लोभस रूप आहेच व बॉलीवूडमधील ऊर्दू संवादलेखकांच्या कृपेकरून आपल्याला समजणारे ऊर्दू शब्द मजा आणतात.

शहनशाह ए फारीस, शहनशाह ए बाझन्तीन (byzantine), शहनशाह ए मिस्र यांना प्रेषित दूताकरवी 'इस्लाम कुबूल' करण्याचे फर्मान पाठवतात. इजिप्त वगळता सर्व राजे ते 'तुम बियाबानो से निकलकर हमे बताओगे की हमे किस खुदा को मानना चाहिये' वगैरे डायलॉग मारून फर्मान फाडून टाकतात किंवा नाकारतात. ही या चित्रपटाची सुरुवात. निवेदन-विवेचन पद्धतीने चित्रपटातील दृश्ये सुरु होतात.     
'मक्का बुतो का मस्कन'
मक्केत अंदाधुंद मूर्तीपूजा सुरु असते. तिथले नेते व काबाचे पुजारी यांनी भोळ्याभाबड्या जनतेला देवाच्या नावे लुटायला सुरु केलेले असते.
अर्थात हा चित्रपट माहितीपटाच्या अंगाने पुढे जात असल्याने कोणत्या देवांची आराधना सुरु होती? कधीपासून सुरु होती? हिंदू मूर्ती त्यात होत्या का? हे त्यात तपशीलवार आलेले नाही व तशी काही तथ्ये कदाचित उपलब्ध असतील तरी ते येऊ शकले नसते. फक्त 'हुबल' व 'लात' या दोन देवतांच्या मुर्ती दाखवणारे एक दृश्य आहे. या दोन देवता समृद्धी देणाऱ्या मानल्या जात.
काबा व त्यातील देवतांच्या मूर्तींमुळे मक्का हे अरब मधील एक महत्वाचे गाव बनलेले असते. मक्केच्या आर्थिक नाड्या काबातील मूर्त्यांमध्ये गुंतलेल्या असतात. त्यामुळे जेवढ्या जास्त मूर्ती तेवढी जास्त आमदनी असा सरळ हिशेब असतो.

अद्याप प्रेषित न झालेले निरक्षर मुहम्मद हे सर्व पाहून व्यथित असतात व मक्केशेजारी असलेल्या पर्वतावरील गुहा (गार) ही त्यांच्या चिंतनाची जागा असते (वो गार में तन्हा थे). या गुहेत त्यांना 'जिब्रईल' या देवदुताचे दर्शन होते. मी देवदूत जिब्रईल असून तुम्ही खुदाचे प्रेषित मुहम्मद आहात हे सांगून  जिब्रईल त्यांना 'ए मुहम्मद.. पढ..' ( हीच कुरानाची सुरुवात) असा आदेश देतो. पण मुहम्मद त्याला मी निरक्षर आहे.. मी वाचू शकत नाही हे सांगतात. मग जिब्रईल 'पढ उस खुदा के नाम से जिसने इन्सान को खून की नाजूक बूंद से बनाया..' असे सांगतो.
या प्रसंगानंतर मुहंमदांना प्रचंड ताप चढतो व ते झालेली घटना जवळच्या नातेवाईकांना सांगतात. इथून पुढे वेळोवेळी मुहमंदांवर खुदाच्या वहीचे नुजूल होते व मुहम्मद तो संदेश लोकांना ऐकवू लागतात.


या संदेशांत सर्वात महत्वाचा व मक्काधिपती आणि मुहम्मद यांच्यात (व ईस्लाम व अन्य धर्मांतही ) वितुष्ट घड्वून आणणारा संदेश असतो तो म्हणजे - "एकच देव आहे व मुहम्मद हे त्याचे प्रेषित आहेत." (ला ईलाहा ईल्लला मुहम्मद रसूल्लीला (चु.भू.द्या.घ्या.) हा अरबी भाषेतील संदेश ऊर्दूमध्ये खुदा के सिवा कोई माबूद नहीं.. मुहम्मद खुदा के रसूल है असा दाखवण्यात आला आहे..  )

मक्कावासियांच्या मनात उलथापालथ घडवून आणणारे इतर संदेशही (देव एकच आहे व तो मूर्तीत बांधला जाऊ शकत नाही..  त्यामुळे काबा मध्ये ठेवलेल्या मूर्ती व त्यांची आराधना निरर्थक आहे.. स्त्री ही पुरुषाएवढीच महत्वाची आहे.. मुलींची जन्मतःच हत्या करणं पाप आहे...) मुहम्मदांना मिळतात. हे सोड्ता इतर संदेशांमागची  सामाजिक पार्श्वभूमी  चित्रपटात तेवढ्या तपशीलवार येत नसल्यानं ते बिगर मुस्लिम प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत नाहीत. पण मुहम्मदांच्या या संदेशांकडे अनेक मक्कावासी आकर्षित होतात.. त्यांना ऐकण्यासाठी नियमीतपणे येऊ लागतात.
मुहम्मदांच्या संदेशांना मानणार्‍या लोकांच्या वाढत्या संख्येमुळे मक्काधिपतींचे धाबे दणाणते. मक्केतील गुलामसुध्दा मुहम्मदांच्या बाजूने होतात. मक्काधिपती मुहम्मदांच्या काका मार्फत त्यांना निरोप पाठवतात की आम्ही तुला अधिकार आणि पद देऊ.. पण तु तुझी शिकवण बंद कर. मुहम्मद ते नाकारतात. मग संघर्ष आणखीच तीव्र होतो.
मुहम्मदांवर "खुद कलामी" (संदेश वगैरे काही नाही.. हा स्वतःच काव्य रचतोय) चे आरोप केले जातात.
त्यातच मुहम्मदांना ईस्लाम जाहीर करण्याचा संदेश मिळतो व त्यांचे अनुयायी काबासमोर मोर्चा घेऊन धडकतात. तिथे मूर्तीपूजा मानणारे मक्कावासी व मुहम्मदांचे अनुयायी यांच्यात मारामारी होते. इथे  सिंहाचे शिकारी असणारे मुहम्मदांचे दुसरे एक काका हमजा (अँथनी क्वीन) मुहम्मदांची बाजू  घेतात व मुहम्मदांच्या अनुयायांवर दगडफेक करण्याचा आदेश देणार्‍या काबाच्या पुजार्‍याला एका झापडीत खाली पाडून जमावाला स्वतःसोबत लढण्याचे आव्हान देतात. जमाव गुपचूप पांगतो. हमजाने ईस्लाम  स्वीकारल्याने मुहम्मदांचा पक्ष थोडा मजबूत होतो.



मग मक्केचे नेते आणखी चिडून मुहम्मद व त्यांच्या अनुयायांना वाळीत टाकतात. त्यांची घरे लुटली जातात व काही लोकांची हत्याही होते. शेवटी जीव वाचवण्यासाठी गुलाम व  काही लोकांना शेजारच्या "हबशाच्या बादशहा" च्या राज्यात पाठ्वण्यात येते. हा हबशाचा बादशहा ख्रिश्चन असतो. तिथेही मक्केचे नेते त्यांचे लोक पाठ्वून 'गुलाम और मजहब के बागी' परत मागतात.  इथे हबशाच्या बादशहासमोर झालेला कुराण वाचून दाखवण्याचा प्रसंग पहाण्यासारखा आहे. कुराणात मदर मेरी आणि येशू ख्रिस्ताबद्दल उल्लेख असल्याने सुखावलेला बादशहा (तुममे और हम में फर्क सिर्फ इस लकीर जितना है ) गुलाम व मक्केच्या लोकांना परत मक्केत पाठवण्याचे नाकारतो. या काळात मुहम्मद मात्र मक्केतच असतात,  त्यांना त्यांच्या मोठ्या  काकांचा आधार असतो. मक्केच्या नेत्यांचे या काका मार्फत मुहम्मदांना समजाऊन सांगण्याचे प्रयत्न सुरु असतात. पण वृध्द झालेल्या काकांचा मृत्यू होतो.     

काही काळाने मुहम्मद मक्का सोडून मदिना मध्ये  रहायला  जातात. वाळवंटातील रस्त्यात एकट्या पडलेल्या मुहम्मदांवर मारेकरी पाठ्वले जातात. पण ते ज्या गुहेत लपलेले असतात तिच्या तोंडावर कोळ्याचे जाळे पाहून इथे कुणी नसेल असे समजून मारेकरी परत फिरतात.

मदिनामध्ये मुहम्मदांच्या आगमनानंतर ईस्लामच्या पहिल्या मशीदीचे बांधकाम, एका काळ्या गुलामाला मशिदीतून पहिली बांग देण्यास प्रोत्साहन देणे, नमाजची वेळ झाल्यानंतर लोकांनी दुकान उघड्यावर टाकून ओस पडणारी मदिना वगैरे दृश्ये मस्त आहेत.

पुढे मदिना वासियांना तीन वर्षातून एकदा मक्केची यात्रा करण्याचा मक्का-मदिनामध्ये करार होतो. प्रेषित मुहम्मदांसोबत खुदा सर्वप्रथम मक्केत 'हम कलाम' झाला असल्याने मादिनेतील मुस्लिमांच्या मनात मक्केबद्दल एक वेगळा आदर असतो.    

पण यात्रेकरूंवर मक्केच्या काही लोकांनी अचानक हल्ला केल्याने दोन्ही पक्षात पुन्हा संघर्षाची ठिणगी पडते व युद्ध होऊन मक्केचे बरेच महत्वाचे लोक मारले जातात.
अबू सुफियान या मक्केतील बड्या असामीच्या बायकोचा (हिचं नाव 'हिंद' असं आहे ) भाऊ हमजाकडून मारला जातो. ती मग चिडून भाला फेकण्यात तरबेज असलेल्या गुलामाला नेमून हमजाचा काटा काढते.
फार प्रभावी नसली तरी वाळवंटातील युध्दाची दृश्ये व वाळवंटात चित्रित झालेला हा एकूणच चित्रपट काहीतरी क्लासिक पहात असल्याची मजा देतो. वाळवंटातील दोन-तीन युध्दांचे प्रसंग चित्रपटातच पहाण्यासारखे आहेत.
   
मक्केवर मदिनावासियांचा विजय व मुहम्मदांनी काब्यावरुन दिलेला खुत्बा व संदेश यावर चित्रपट संपतो.

सर्व चित्रे जालावरुन साभार.

२२ जुलै, २०११

झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये - ३


Christopher Calder
Rajneesh spoke on a high level of intelligence and his spiritual presence emanated from his body ike a soft light that healed all wounds. While sitting close during a small gathering of friends, Rajneesh took me on a rapidly vertical inner journey that almost seemed to push me out of my physical body. His vast presence lifted everyone around him higher without the slightest effort on their part. The days I spent at his Bombay apartment were like days spent in heaven. He had it all and he was giving it away for free!
Rajneesh possessed the astounding powers of telepathy and astral projection, which he used nobly to bring comfort and inspiration to his disciples. Many phony gurus have claimed to have these mysterious abilities, but Rajneesh had them for real. The Acharya never bragged about his powers. Those who came near soon learned of them through direct contact with the miraculous.

                  क्रिस्तोफर काल्डर रजनीश मुंबईच्या Woodland अपार्टमेंटमध्ये रहात असताना त्यांना भेटला होता. त्याचे संन्यासाचे नाव स्वामी कृष्णख्रिस्त होते. त्याने रजनीशांचे सुरुवातीचे दि सायलेंट एक्स्प्लोजन लिहिले असाही तो दावा करतो. पण ओशो फौंडेशनने तो फक्त त्या पुस्तकाचा संपादक असल्याचा खुलासा केला आहे. काल्डरवर इथे लेखणी झिजवण्याचे कारण म्हणजे तो रजनीशांचा माजी संन्यासी व नंतरचा विरोधक आहे. काल्डरचे आरोप व त्यावरील ओशो फौंडेशनचे खुलासे या आंतर्जालीय मारामारीतून प्रचंड आंतर्जालीय कचरा निर्माण झाला आहे. अर्थातच तो उपसण्याचे कारण नाही. रजनीशांचा विरोधक झाल्यानंतरही काल्डरच्या वर दिलेल्या मतप्रदर्शनाला वेगळे महत्व आहे. कारण त्यातून अनेक प्रश्न उभे रहातात. रजनीशांकडे तथाकथित दिव्यदृष्टी होती व त्यांच्या उपस्थितीत भारून टाकल्याचा अनुभव येत असे तो म्हणतो त्यात तथ्य वाटते.    
                  आचार्य अत्र्यांच्या कन्यका व रजनीशांच्या भक्त शिरीष पै (इथे आचार्य अत्र्यांनी लिहिलेल्या “तो मी नव्हेच” नाटकातील लखोबा लोखंडे आठवावा. शिरीष पै रजनीशांच्या भक्त झाल्या असताना आचार्य अत्रे हयात होते. शिरीष पै यांच्या विनंतीवरून मराठा प्रेसच्या कर्मचारी/वाचकांसाठी आचार्य अत्र्यांच्या उपस्थितीत रजनीशांनी एक व्याख्यानही दिले होते.पुढे रजनीश बंगळुरुला गेले असताना ते ज्या यजमानाकडे उतरले होते त्याने रजनीशांच्या शिष्येला रजनीशांच्या खोलीत झोपू देण्यास नकार दिला व रजनीशांना त्याने घराबाहेर काढल्याची बातमी आली तेव्हा आचार्य अत्रे अत्यंत नाराजीने "शेवटी सगळे सारखेच " म्हणाल्याची नोंद ही प्रतिभावंत ध्यानयोगी मध्ये आहे) यांनी रजनीशांवर लिहिलेल्या “प्रतिभावंत ध्यानयोगी” या पुस्तकातही शिरीष पै नी याच अर्थाची विधाने केली आहेत. बाकी विदेशी संन्यासिनी येऊ लागल्यानंतर रजनीश या त्यांच्या गुरुदेवांनी आपल्याकडे कसे दुर्लक्ष केले आणि त्यांच्या जवळ गेलेल्या इतर भवान्यानी आपल्याला कसे पाण्यात पाहिले यावर शिरीष पैनी आधीच छोट्या असलेल्या या पुस्तकाची बरीच पाने खर्ची घातलेली आहेत. असो.
                 तर काल्डर व शिरीष पै यांची रजनीशांकडे तथाकथित दिव्यदृष्टी असल्याची विधाने. मग प्रश्न असा निर्माण होतो की, दिव्यदृष्टी तसेच स्वत:च्या उपस्थितीने लोकांना भारून टाकण्याची जादू असणारा रजनीश संपत्तीच्या मागे का लागतो? जागृत होऊनही तो समाधानी राहू शकत नाही?  तो या तथाकथित शक्तींचा वापर स्वत:चे साम्राज्य उभे करण्यासाठी का करतो? विदेशात उपचार करून घेण्याचा बहाणा करून, वास्तविक कर चुकवण्यासाठी भारतातून स्वत:चे तोंड काळे का करतो? आणि तिथेही तेच धंदे केल्याने विदेशी शासनाने जबर दंड वसूल करण्यासह पार्श्वभागी लत्ताप्रहार केल्यावर इकडे परत येऊन पुन्हा पहिले पाढे पंचावन करून त्याची प्रेयसीही आत्महत्या करते, तो ही व्यसनी होतो आणि शेवटी “माझे शरीर हे माझ्यासाठी नरक बनला आहे” हे विधान करून इहलोक सोडतो?
                   या सगळ्या गोंधळात एकच सत्य, नव्हे शोकांतिका अधोरेखित होते की तथाकथित जागृत पुरुष देखील कुठल्याही सामान्य माणसासारखे लोभी, अहंकारी, पतनशील व अज्ञानी असतात. त्यांच्या कुठल्याही करिष्म्याला भुलून जीवन समर्पित करणारे निष्ठावान अनुयायी असा जागृत पुरुष किंवा स्त्री गेल्यानंतर त्याच्या नावे रडण्या भेकण्याशिवाय व तक्रारींशिवाय काहीही करू शकत नाहीत.
ओरेगोनियन या अमेरिकन वृत्तपत्राने रजनीश प्रकरणावर त्याकाळी चालवलेले कव्हरेज आंतर्जालावर उपलब्ध आहे. जिज्ञासूंसाठी दिलेली लिंक मोठाच खजिना ठरेल. भारतात व त्यातल्या त्यात मराठी साहित्यात ओशो फौंडेशनच्या कृपेने रजनीश या भामट्याबद्दलची तपशीलवार सत्यता प्रकाशात आजवर प्रकाशात येऊ शकलेली नाही. आजही या भामट्याच्या पुस्तकांचा हजारोंनी खप होत असताना कुणी प्रकाशक ती छापण्याची शक्यता नाही.
झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये!

मला तुरुंग आणि बाहेरचे जगही सारखेच आहे. यामुळे मला तुरुंगाचा अनुभव मिळाला - रजनीश



खरा चेहरा - अगदी कुठल्याही गुन्हेगारासारखेच भाव. नेहमी प्रसारासाठी काढल्या जाणाऱ्या फोटोतील दैवी तेज, प्रसाद आणि हसू शेरीफच्या ऑफिसमध्ये टिकू शकले नाही

२० जुलै, २०११

झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये - २

रजनीशांनी अज्ञाताच्या भांडवलावर आध्यात्माचा बाजार सुरु केला. हा माणूस स्वत:चा ब्रांड स्थापन होई पर्यात सुरुवातीला दिवसाचे बारा-अठरा तास वाचन करीत होता. तीच माहिती लोकांसमोर अशा खुबीने पेश करीत होता की क्या कहने. अर्थात यावर नाराज होण्याच काहीच कारण नाही. तक्रार ही आहे की त्याने कुणालाही उपलब्ध होऊ शकत असलेल्या या माहितीचा वापर स्वत:ची “एक जागृत झालेला माणूस” अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी अगदी बेमालूमपणे केला.
धर्माच्या नावाखाली चालत आलेल्या ज्या शोषणाविरुद्ध त्याने जन्मभर कंठशोष केला त्याच शोषण शृंखलेचा  रजनीश हा पुढे चालून मुकुटमणी बनला, एवढा मोठा मुकुटमणी की या सम हाच! भारताच्या अनेक शहरांत ध्यान प्रसारासाठी एक साधी लुंगी व पंचा घालून पायपीट करणारे “आचार्य” रजनीश, विदेशी चेल्यांची थोडीशी संख्या वाढताच स्वघोषित “भगवान” बनून लगेच रोल्स राईस वापरताना दिसतात तेव्हा मजा वाटते.




त्यांनी ब्याण्णव रोल्स राईस व हिरे वापरले ही तक्रार नाहीच, तर “लोक माझ्याकडे असलेल्या या भौतिक गोष्टींची चर्चा करतात, त्यांना त्याचे आकर्षण आहे.. मला नाही.. लोकांना आकर्षीत करण्यासाठी हे आहे” या गोंडस सबबीखाली रजनीशांनी ते वापरले. त्यांना नायट्रस ऑक्साईड व Valium चे व्यसन असल्याचे आरोप त्यांच्याच सेक्रेटरीने केले. खरे पाहता ही व्यसने त्यांना डॉक्टरांनी सुचवलेल्या औषधातून लागली. रजनीशांनी Books I Have Loved, Glimpses of a Golden Childhood, आणि  Notes of a Madman मधील पुस्तकाचा मजकूर नायट्रस ऑक्साईडच्या अमलाखाली कथन केला आहे, रजनीशांनीच त्या पुस्तकांत सांगितले आहे. या पुस्तकांच्या विचित्र कथन शैलीमुळे ही ते सहज लक्षात येते.      
अमेरिकन सरकारने त्यांची हकालपट्टी केल्यांनतर रोल्स राइस लिलावात काढल्या. त्यापूर्वी रोल्स राईसकडे केलेल्या चौकशीत कंपनीने सांगितले की रजनीश खरेदी करीत असलेल्या नव्या रोल्स राईसच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल फोनवरून तासनतास सूचना देत बसत. त्या त्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच रंगवून हव्या असत. त्यांच्या या रोल्स राईस प्रकरणावरच एक वेगळा लेख होऊ शकतो, पण रजनीश म्हणतात त्याप्रमाणे बिती ताही बिसार दे!


९२ रोल्स राईस पैकी एक

रजनीश अविवाहित होते. क्रिस्टीना वाल्फ नावाची ब्रिटीश महिला त्यांची प्रेयसी होती. रजनीशांच्या  लहानपणी त्यांची शशी नावाची प्रेयसी होती; ती लहानपणीच वारली. मरताना या शशीने परत येण्याचे वचन दिले होते व क्रिस्टीना वाल्फच्या रुपात जन्मून शशी परत आली आहे असे रजनीशांनी म्हटले. अमेरिकेतून रजनीशांच्या हकालपट्टीनंतर या क्रिस्टीना वाल्फने मुंबईच्या एका हॉटेलात झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्त्या केली.


क्रिस्टीना वाल्फ उर्फ तथाकथित शशी, सन्यासी मा विवेक

जगभरातून लोक पुण्यातील कम्युन मध्ये येतात, पण पुण्यातील लोक मात्र इकडे फारसे फिरकत नाहीत असा प्रश्न व्याख्यानात त्यांना विचारण्यात आला. तेव्हा पुणे शहर “एक मरी हुयी बस्ती” असल्याचे त्यांनी पुणे कम्युन मध्येच दिलेल्या व्याख्यानात म्हटले होते, आणि पुण्यात त्यांनी सातशे वर्षांपूर्वी तप केले असल्याचा अगोदर  दावा केला होता. त्यांच्या मृत्युनंतर कम्युनमुळे पुणे हे जागतिक तीर्थक्षेत्र बनेल ही भविष्यवाणीही रजनीशांनीच केली होती.
बहुसंख्य लोक फिदा असतात ती रजनीशांची तर्कशक्ती व त्यांच्या साहित्यावर. वास्तविक प्रचंड रिपिटेशनशिवाय त्यात काहीही नाही. त्यांनी दिलेले एकनएक उत्तर एनलायटन्मेंटच्या प्रोडक्ट भोवती फिरत राहते. रजनीशांच्या आयुष्यातील विरोधाभास लिहायचे नाही असे ठरवले होते, कारण ते लक्षावधी आहेत, व ते चघळत बसण्याचे काहीच कारण नाही. पण अनुरूप वाटतील त्या ठळक गोष्टी मांडल्याशिवाय पर्याय नाही.    
सुरुवातीची अत्यंत थोडकी व्याख्याने सोडली तर इथून तिथून सगळे रजनीश साहित्य “ध्यान” आणि फक्त ध्यान याच मुद्यावर केंद्रित आहे. विविध थेरपीज असोत की तत्वज्ञान, मानसशास्त्र की जगातील कोणताही विषय, त्याचा कसा का होईना त्यांनी ध्यान व एनलायटन्मेंटशी संबध जोडला.  
रजनीशांचा माजी संन्यासी व नंतरचा टीकाकार Christopher Calder ते जागृत पुरुष असल्याचे मान्य करतो, पण जागृत पुरुष स्खलनशील नसतात हे त्याला मान्य नाही. त्याच्या शब्दात –

Rajneesh spoke on a high level of intelligence and his spiritual presence emanated from his body ike a soft light that healed all wounds. While sitting close during a small gathering of friends, Rajneesh took me on a rapidly vertical inner journey that almost seemed to push me out of my physical body.  His vast presence lifted everyone around him higher without the slightest effort on their part.  The days I spent at his Bombay apartment were like days spent in heaven.  He had it all and he was giving it away for free!
   
Rajneesh possessed the astounding powers of telepathy and astral projection, which he used nobly to bring comfort and inspiration to his disciples.  Many phony gurus have claimed to have these mysterious abilities, but Rajneesh had them for real.  The Acharya never bragged about his powers. Those who came near soon learned of them through direct contact with the miraculous.

पुढील भागात रजनीशांच्या शैलीचे विच्छेदन    
   
   
           

१८ जुलै, २०११

झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये - १

- यशवंत कुलकर्णी

सत्तरच्या दशकात उठलेले रजनीश नावाचे वादळ आता जवळपास विस्मरणात गेले आहे. यापूर्वी मी लिहिलेल्या यु. जी. विषयीच्या लेखमालेत रजनीशांचा जरुरीपुरता आढावा घेतला आहे. पण हा विषय तेवढ्यात संपणारा नाही. म्हणून मुद्दाम रजनीश हा विषय ठरवून लिहिलेली ही लेखमाला लिहिण्याचे योजिले आहे. विविध पैलूंतून रजनीश उलगडून समोर मांडण्याचा, आणि कोणताही आरोप न करता, या माणसाचा धूर्तपणा, त्याची खरोखर पोहोच कुठवर होती हे खुद्द वाचकांनाच दिसावे असा प्रयत्न आहे.
रजनीश कोण होते, त्यांनी भारतात व अमेरिकेत काय भानगडी केल्या, त्यांच्या बुद्धीची झेप किती मोठी होती वगैरे तपशीलात जाण्याचे कारण नाही. रजनीश उदो उदो करणारे व रजनीश मुर्दाबाद छाप साहित्य आंतर्जालावर उपलब्ध आहे.
त्यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपासून (पुंगलिया बंधू, टिंबर मार्केट) पुण्यात व भारतभरात दिलेली व्याख्याने (जवळपास ४००० तासांचे रेकॉर्डिंग), बरीचशी पुस्तके, अमेरिकेत पत्रकारांना दिलेल्या मुलाखती आणि अमेरिकेतून हकालपट्टीनंतरची व्याख्याने हे सगळे मी ऐकले, चित्रफितीवर पहिले आहे.
त्यांचे साहित्य आणि वाणी आवडत होती, प्रभावीतही झालो होतो. रजनीश कसे बरोबर आहेत आणि जग त्यांना ओळखण्यात कसे चुकले आहे हे सांगणारे लेखही सकाळ व लोकमत मध्ये मी लिहिले. इथल्या ओशोप्रेमींच्या ध्यान शिबिरातही मी अनेकवेळा गेलो – व नंतर ध्यान करू लागलो. एवढं, की मला नोकरी सोडून दोन वर्षे फक्त ध्यानासाठी द्यावी वाटली. एवढ्यासाठीच हे तपशीलवार सांगत आहे की, नंतर नीट अभ्यास न करता काहीबाही लिहिल्याचा आरोप होऊ नये.
मी रजनीश ऐकत होतो पण कुठेतरी खोलवर हा माणूस फसव्या आहे, हा भासवतो तसा पूर्ण पारदर्शक बिलकुल नाही हे नेहमी वाटायचं, पण अगदी किंचित, ओझरतं. कदाचित आपणच समजून घेण्यात चुकत असू असं मानून ध्यान करीत होतो. पण ध्यानात जस-जसा खोलवर जाऊ लागलो तस-तसा या माणसाचा खरा चेहरा दिसू लागला.
मला जे तथाकथित समाधीचे अनुभव आले तेव्हा मी हादरून गेलो. ध्यानात एका उन्मुक्त भावावास्थेच्या क्षणी मी दशदिशांना विस्तारलो आहे ही जाणीव होत असतानाच “आता पुढे काय” हा मनात चाललेला विचार मला सुस्पष्टपणे दिसू शकत होता! विचार थांबल्याशिवाय समाधीप्रवेश होतच नाही या समजाला धक्का बसला होता. सविचार समाधीही असते हे लक्षात आले.  
 तरीही या माणसाचे फोटो फेकून देऊन पुस्तके जाळून टाकण्याचे धैर्य माझ्याकडे नव्हते, हे मुद्दाम नमूद करतो. ते धैर्य ते युजी वाचल्यानंतर आले. रजनीश गेले आणि युजी आले असे नाही. दोघेही गेले.    
  अजूनही कुठेतरी वाटत होतं की, नाही प्रत्येकाची व्यक्त होण्याची पध्दत वेगळी असते – शेवटी सत्य एकच आहे. रजनीश कसेही असोत, त्यांना ऐकले म्हणून आपण ध्यान करू लागलो हेच मोठे उपकार आहेत. पण या समजुतीआड मला दिसलेले रजनीश कसे ते लिहिणे राहून जात होते.    



   
अज्ञाताचे भांडवल
जागृत झालेल्या माणसाला सगळेच ज्ञात असते – काय वाट्टेल त्यावर तो बोलू शकतो व ते पूर्णतः सत्य असते असा एक सर्वसाधारण समज असतो. असा माणूस व इतरेजन यांच्यातील फरक म्हणजे आध्यात्माच्या वाटेवर चालून कुठेतरी पोहोचलेला तो, त्या विषयातील अनुभवांमुळे ज्ञानी. बाकी सर्व अज्ञानी अशी सर्वमान्यता. वरून पुन्हा तो लोकांना ज्ञान विसरण्याची शिकवण देत असतो! त्याला काहीतरी जगावेगळे मिळालेले असते किंवा तो स्वत:च ते जे काही असेल त्यात हरवलेला असतो. किंवा असूनही शिल्लक उरलेला नसतो. इतरांनाही तसे कसे होता येईल हे तो सांगत असतो. एकीकडे अज्ञानी होण्याची शिकवण देताना तो त्याच्या ज्ञानाचा घडा आपल्या डोक्यावर बदाबदा ओतत असतो. ही अज्ञातातील उडी असते, हेच अज्ञाताचे भांडवल असते. हे अज्ञाताचे भांडवल रजनीशांना जन्मभर पुरले. जागृत झाल्याचा जो दावा करील तो हमखास स्वत:ची फसवणूक करीत आहे असे समजा हे रजनीशांनी सांगितले होते. आणि ते जागृत झाल्याचा दावाही त्यांनी स्वत:च केला होता! आडवे-तिडवे प्रश्न विचारणारास त्यांचे सरळ सांगणे असे – “तुम्ही जागृत आहात तर इथे कशाला आलात, जागृत नसाल तर माझे ऐकून घ्या.. आणि मनात समर्पण जन्मू द्या...”  
त्यांनी जगभरात होते नव्हते तेवढे सर्व सद्गुरू उकरून काढले व त्यांच्या साहित्यावर रसाळ व उद्बोधक व्याख्याने दिली. जे. कृष्णमूर्ती व यु.जी. कृष्णमूर्ती या समकालीन जागृत पुरुषांची मात्र चुकुनही भेट घेतली नाही.




(क्रमश:)

१ जुलै, २०११

नानासाहेब फडणवीसांचे चित्र विकणे आहे


भारतातील सर्वात महत्त्वाच्या ऐतिहासिक मुत्सद्यांपैकी एक नाना फडणवीसांचे पोट्रेट लंडनच्या सोथबी ऑक्शन हाऊसमध्ये लिलावासाठी ठेवण्यात आले आहे. हे चित्र ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीचा चित्रकार थॉमस सीटनने सन १७७८ मध्ये काढले असल्याची चित्राच्या मागे नोंद आहे.
मूळ नाव  बालाजी जनार्दन भानू असलेले  नाना फडणवीस हे पेशवाई दरम्यानच्या मराठा साम्राज्यातील एक आघाडीचे मंत्री होते.  सन १७७३ मध्ये नारायणराव पेशव्यांचा खून झाल्यानंतर, फडणविसांच्या नेतृत्वाखालील  बारभाईचे कारस्थान इतिहासात प्रसिद्ध आहे. ब्रिटीश राजमध्ये मराठा साम्राज्याचे स्वातंत्र्य अबाधित राखणे हे नानासाहेब फडणविसांच्या मुत्सद्देगिरीचे यश मानता येईल. नाना फडणवीस १३ मार्च १८०० रोजी वारले.
त्यांच्या मृत्युनंतर भारताचा तत्कालीन गवर्नर जनरल लॉर्ड रिचर्ड वेलस्लीने नानाबद्दल  ""the able minister of Peshwa state, whose upright principles and honourable views and whose zeal for the welfare and prosperity, both of the dominions of his own immediate superiors and of other powers, were so justly celebrated" हे उद्गार काढले होते.

सोथबीने विकायला काढलेले चित्र त्यांच्या संकेतस्थळावरून:      http://www.sothebys.com

चित्राची किंमत ७०,००० पौंड अपेक्षित आहे.

बातमी सौजन्य : ईटी



२३ जानेवारी, २०११

बाळासाहेब















हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आज ८५ वर्षांचे झाले! राजकारणातला असो नसो, शिवसेनेची भूमिका मानणारा असो नसो महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येकानं क्षणभर थांबून या सम्राटाचं अभिष्टचिंतन करण्याचा हा दिवस आहे. कारणे स्पष्ट आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या महाराष्ट्रीय अस्मितेमधील बाळासाहेब ठाकरे हे मुकूटणी आहेत; बाळासाहेब हा एक संस्कार आहे! हे व्यक्तीमत्वच करिष्माई आहे. शिवसेनाप्रमुख म्हणून त्यांनी निभावलेल्या भूमिकांबद्दल वाद असतील, पण तो बाळासाहेबांचा फक्त एक पैलू आहे; आणि त्यातूनही कुणाच्याही मनावर आक्रामकता, रोखठोकपणाचाच ठसा उमटतो.
कुंचल्याच्या फटकार्‍यांतून विरोधकांना गारद करणारे बाळासाहेब, खींचो न कमान को न तलवार निकालो - जब तोप मुकाबील है तब अखबार निकालो म्हणणारे बाळासाहेब! लाखोंच्या सभेसमोर उभे राहून हात पसरून महाराष्ट्रातील माताभगिनी आणि तमाम मराठीजनांना आवाहन करणारे बाळासाहेब. कोणत्याही काळात, कोणत्याही देशात निर्माण होणार्‍या महानायकाचा एक महत्वाचा गुणविशेष मानला जातो तो हाच की त्या नेत्यामुळे, त्याच्यासोबतच्या आणि नंतरच्या पिढ्यांमध्येही प्राण फुंकला जातो. तो नेता, फक्त नेता राहात नाही तर सर्वांसाठीच ते एक संचित बनून जाते. बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्वात नक्कीच ही जादू आहे.
बाळासाहेबांच्या वक्तृत्वातील जादू ही की, त्यांच्या टिकेचा विषय बनलेल्या कोणत्याही व्यक्तीला ते त्यांच्या अभिनयाच्या क्षमतेमधून हुबेहुब जीवंत करून श्रोत्यांसमोर उभा करतात आणि तिथेच त्याची साले काढायला सुरूवात होते. मग अशा असंख्य उदाहरणांत बाळासाहेबांच्या मिष्किल अभिनयातून फटके खाणारे, सोनिया गांधींना तलवार दिल्याची आगळीक केलेले बाबासाहेब पुरंदरे  (या उद्याच्या पंतप्रधान, आम्हाला मॉं साहेबांसारख्या दिसत आहेत) असतील की काश्मीरच्या मढ्यावरचं लोणी खाणारे फारुख अब्दुल्ला  (गुलाबी, गुलाबी - बापाचा माल!) असतील. राज ठाकरे यांना विधायक कामासाठी पब्लिक एंटरटेन्मेंटमधून इमोशनल एनकॅशमेंट आज भलेही करता येत असेल पण तो संस्कार बाळासाहेबांचा आहे, हे ते सुध्दा मान्य करतील.
मला, मलाच काय वक्तृत्व या अभिव्यक्तीचा अभ्यास करणार्‍या कुणालाही बाळासाहेब या व्यक्तीमत्वामधला नेहमीच आकर्षित करणारा गुणविशेष म्हणजे अगदी कमीत कमी वाक्यांमध्ये टिकाविषयाचा अचूक वेध घेणारी त्यांची शब्दफेक आणि खास ठाकरी शैलीतील बॉम्बफेक. मागे एकदा सिंहगडाच्या पायथ्याशी झालेल्या रेव्ह पार्टीचा दसरा मेळाव्यात समाचार घेताना एका मिष्किल, तिरकस आजोबांच्या शैलीत बाळासाहेब असेच काहीसे उद्गारले होते - "आजकाल हे एक आलंय नवं खूळ - रेव्ह पार्ट्या... जंगलात जायचं, एकमेकांना आवळायचं.." बस्स.. बस्स..बस्स !!! पुढे काही बोलण्याची गरजच नाही - समजणार्‍याला सगळं समजून येतं.
   महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ही तोफ गावोगावच्या मैदानांवर कडाडत असताना प्रभु चावलांनी योग्य तो आदर राखून घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीतील बाळासाहेब असोत की इंग्लिशमध्ये वीर सिंघवीच्या तिरकस, धाडस करून थेट विचारलेल्या प्रश्नांना छप्परफाड उत्तरे देणारे, मुलाखत संपताच "जय हिंद, जय महाराष्ट्र!" म्हणून पुढे क्षणभरही वाट न पाहता ताड्कन चालते होणारे बाळासाहेब असोत - बाळासाहेबांच्या वक्तृत्वातील ती अदृश्य जादू आजही पंच्याऐंशीव्या वर्षीदेखील तेवढीच टिकून आहे.
शेवटी एवढंच म्हणतो, आई भवानी बाळासाहेबांना अशाच प्रभावी वक्तृत्वाचं शतक ठोकण्याचं बळ देवो!

२१ जानेवारी, २०११

माईंड इज ए मिथ


यापूर्वी इथे यु.जी. कृष्णमूर्तींबद्दल एक लेखमाला लिहिण्याचा योग आला होता. त्यात यु.जी. या व्यक्तीमत्वाबद्दल बरीच माहिती सादर करता आली असली तरी त्यात लोकांशी झालेला युजींचा वास्तविक संवाद हा अत्यंत कमी होता. यु.जी. कृष्णमूर्तींसोबत साधलेल्या संवादांचे संकलन असलेली "माईंड इज ए मिथ", "मिस्टिक ऑफ एन्लायट्न्मेंट" आणि "थॉट इज युवर एनेमी" ही पुस्तके मी पुन्हा एकदा वाचत आहे; त्यातीलच एका पुस्तकातील प्रकरणाचा मी मराठीमध्ये अनुवादीत केलेला हा काही भाग. वाचकांना आवडल्यास, पुढील भाग अनुवादीत करायला आनंद वाटेल; मी एरव्ही वाचणार आहेच. पण ते वाचन इथल्या वाचकांनाही सहभागी करता आले तर आणखी आनंद होईल. 
ज्यांनी पूर्वीची लेखमाला वाचलेली नसेल आणि वाचण्याची इच्छा असेल तर कृपया सर्व सातही भागाचे दुवे खाली दिले आहेत.


, , , , , ,
    



माईंड इज ए मिथ
यु.जी. कृष्णमूर्तींशी प्रश्नोत्तरे
भाग एक
सर्वकाही फोडून टाकणारी निश्चितता

युजी: मी कधीच व्यासपीठावर बसून बोलत नाही. किती कृत्रिम असते ते. काही गोष्टी गृहित धरून किंवा अस्पष्ट अर्थात समोर ठेऊन बसून बोलत राहाणे वेळेचा अपव्यय आहे. रागावलेला माणूस रागाबद्दल बोलत बसत नाही आणि रागाबद्दल मोठ्या आनंदाने संवादही साधत नाही; त्याचे माथे फिरलेले असते. त्यामुळे तु रागीट आहेस आणि म्हणून तुला अडचणी येतात हे मला सांगू नकोस. क्रोधाबद्दल बडबड कशाला हवीय? केव्हातरी, कसेतरी तुम्हाला राग येणे कायमचे थांबेल आशेवर तुम्ही जगता आणि त्यातच मरता. त्या आशेचेच ओझे तुमच्यावर आहे, आणि त्यात हे जीवन निरर्थक वाटले की तुम्ही पुनर्जन्माचा शोध लावता.    
प्रश्न: ठीक आहे, तुमच्या बोलण्यातून कुणालाही आशा मिळते असे बिलकुल म्हणता येणार नाही. मग सांत्वन किंवा सूचना द्यायच्या नसूनही तुम्ही का बोलत राहाता?
युजी: मग मी करावे तरी काय? तुम्ही येता, मी बोलतो. तुम्हाला दगड फेकून मारून मी तुमच्यावर टिका करत राहावी हे तुम्हाला हवे आहे? ते निरर्थक आहे कारण तुमच्यावर कशाचाही प्रभाव पडत नाही कारण तुमच्याभोवती एक अभेद्य चिलखत उभे आहे. तुम्हाला काहीच वाटत नाही. तुम्हाला तुमची स्थिती समजून घेता येत नसल्याने, तुम्ही विचारांच्या माध्यमातून प्रतिक्रिया देता ज्यात तुमच्या कल्पना आणि मन्तव्य असते. विचार ही प्रतिक्रिया असते. तुम्ही ज्या वेदनांतून जात आहात त्या वेदना, त्यांचा अनुभव न घेता इथे माझ्यात प्रतिबिंबीत होत आहेत. इथे त्यांचा बिलकुल अनुभव नाही. बस्स, तेवढेच. या नैसर्गिक स्थितीत तुम्हाला इतरांच्या वेदना जाणवतात, मग तुम्ही त्यांना व्यक्तिश: ओळखत असाल किंवा नसाल. अलिकडेच माझा सर्वात मोठा मुलगा जवळच्याच हॉस्पिटलमध्ये कॅन्सरमुळे मरणासन्न होता. मी ही त्याच परिसरात होतो आणि त्याला नेहमी भेटायला जात असे. माझे मित्र सांगतात की तो मरेपर्यंत मी मलासुद्धा तशाच तीव्र वेदना होत होत्या. मी काहीही करू शकत नाही. वेदना ही जीवनाचीच एक अभिव्यक्ती आहे. त्याच्या कॅन्सरवर मी कसलातरी उपाय करावा असे त्यांना वाटत होते. मी जर ट्यूमरला हात लावला तर तो आणखी वाढेल. कॅन्सर ही पेशींची वाढ, जीवनाची आणखी एक अभिव्यक्ती असते, आणि त्यात मी काही केले तर तो आणखी मजबूत होईल.
प्रश्न: तर मग तुम्हाला इतरांच्या वेदना कळतात तरी तुम्ही त्यापासून बाजूला असता असेच ना?
युजी: वेदना हा एक अनुभव आहे, आणि इथे (स्वत:कडे बोट दाखवून) कसलाही अनुभव नाही. तुम्ही एक गोष्ट आहात आणि जीवन दुसरी एक गोष्ट आहे असे नाही. ती एकच एक सबंध हालचाल आहे आणि त्याबद्दल मी काहीही सांगितले तरी ते चुकीचे, गोंधळात टाकणारे आहे. तुम्ही एक "व्यक्ती", एक "वस्तू", किंवा "इतर" गोष्टींनी व्यापलेली स्वतंत्र आकृती नाही आहात. ही एकच एक, सबंध हालचाल तुम्हाला अनुभवता येणारी गोष्ट नसते.
प्रश्न: पण अनुभवाला येत नसतानाच जगत असणे आमच्या मनाला अतार्किक वाटते.
युजी: मी जे बोलतोय त्यामुळे तुमच्या तार्किक चौकटीत गोंधळ उडतो. ती विभक्त बांधणी तशीच अबाधीत ठेवण्यासाठी तुम्ही तर्क वापरत आहात, बाकी काही नाही. तुमचे प्रश्न हे पुन्हा एकदा विचारच आहेत आणि प्रतिक्रियात्मक आहेत. सगळे विचार प्रतिक्रियात्मक असतात. तुम्ही जीव तोडून हे विचारांचे चिलखत वाचवत आहात, आणि जीवनाच्या हालचालीमुळे तुमचा आधार नष्ट होईल अशी भीती तुम्हाला वाटतेय. जीवन हे खळाळत वाहाणार्‍या नदीसारखे, तिला घालून दिलेल्या सीमांना मोडून टाकील अशा प्रकारे दोन्ही तीरांवर आदळत असते. तुमच्या विचारांची रचना आणि तुमची वास्तविक मानसिक चौकट मर्यादीत आहे, पण जीवन मात्र तसे मर्यादीत नाही. त्यामुळेच स्वतंत्र्यातील जीवन हे शरीराला वेदनादायक असते; इथे होत असणारा ऊर्जेचा प्रचंड खळखळाट शरीरासाठी वेदनादायक आहे, तो होत राहातो तशी प्रत्येक पेशी फुटत जाते. तुमच्या अत्यंत विचित्र स्वप्नातही तुम्ही त्याची कल्पना करू शकणार नाही. त्यामुळेच मी ते कसेही सांगितले तरी ते चुकीचेच होईल.
प्रश्न: गुरू आणि पुरोहितदेखील आम्हाला हेच शिकवतात की वेगळी अशी काही रचना नाही आणि आमच्या प्रश्नांचा तोच उगम आहे. तुम्ही वेगळे काय सांगू शकाल?
युजी: तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठीही, ते फक्त ठणठणीत कोरडे शब्द आहेत. जीवनाच्या एकच एक सबंध हालचालीत तुमचा विश्वास हा फक्त एक निराधार विश्वास असतो, त्यात निश्चितता नसते. गुरू आणि धर्मग्रंथातून तुम्हाला जे शिकवले गेलेय ते तुम्ही अत्यंत हुशारीने तर्कात बांधले आहे. तुमचे विश्वास हे, ते सांगणार्‍या व्यक्तीकडून आंधळ्यासारखे स्वीकारलेले आहेत, सगळा वापरलेला माल. तुम्ही तुमच्या विश्वासापेक्षा वेगळे नाही. जेव्हा तुमचे मौल्यवान विश्वास आणि भ्रम समाप्त व्हायला येतात, तेव्हा तुमचाही शेवट येतो. माझे बोलणे हे तुमच्या वेदनेला दिलेल्या प्रतिसादापेक्षा जास्त काहीही नाही, त्या वेदना तुम्ही तुमचे प्रश्न, तर्कपूर्ण युक्तीवाद आणि इतर मन्तव्यांतून व्यक्त करताय.
प्रश्न: पण तुम्ही इथे बसून तासामागून तास बोलत राहाताय त्यातून निश्चितच हे दिसून येते की तुमचेही एक तत्वज्ञान, एक संदेश आहे, जरी तो ऐकणार्‍यांना नीट समजत नसला तरी.
युजी:  बिलकुल नाही. इथे बोलणारा, सल्ला देणारा, वेदना अनुभवणारा किंवा काहीही अनुभवून घेणारा कुणीही नाही. एखादा बॉल भिंतीवर फेकला की तो परत विरूध्द बाजूला फेकला जातो, फक्त तेवढेच. माझे बोलणे हे तुमच्या प्रश्नाचा थेट परिणाम आहे. माझे स्वत:चे इथे काहीही नाही, कोणताही सुस्पष्ट किंवा लपलेला अजेंडा नाही, कोणतेही प्रॉडक्ट विकायचे नाही, कसल्याही शस्त्राला मी धार लावत नाही आणि काहीही सिध्द करीत नाहीय.
प्रश्न: पण शरीर हे क्षणभंगुर असते, आणि आपल्या सगळ्यांना कसलेतरी अमरत्व हवे असते. साहाजिकच आपण एका मोठ्या तत्वज्ञानाकडे, धर्माकडे, आध्यात्माकडे वळत असतो. निश्चितच, जर..
युजी: शरीर फक्त अमर असते. वैद्यकिय मृत्यू झाल्यानंतर नवीन आकारात जीवनाच्या प्रवाहात राहून ते त्याचे रूप बदलते. शरीराला "पुनर्जन्म" किंवा कसल्याही प्रकारच्या अमरत्वाशी काही घेणेदेणे नाही. त्याचा आत्ता, या क्षणी जीवंत राहाण्यासाठी आणि वाढण्यासाठी संघर्ष चालू असतो. भीतीमुळे विचारातून तयार केलेला बनावट "पैलतीर" हीच खरी, तसलेच आणखी पुढेही चालू राहाण्याची मागणी आहे. त्याच गोष्टीची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होण्याची ही मागणी हीच अमरत्वाची मागणी आहे. असले अमरत्व शरीराला नको आहे. कायम टिकून राहाण्याची विचाराची मागणी शरीराची घुसमट करून दृष्टीकोन धूसर करीत आहे. विचार हा स्वत:च स्वत:चे रक्षण करीत स्वत:ला टिकवून ठेवण्यापुरते पाहाण्यासोबतच, शरीरही टिकवायला पाहातो. दोन्हीही पूर्णत: चुकीचे आहेत.
प्रश्न: असे दिसते की मूळापासूनच कसलातरी पूर्णत: बदल व्हायला हवा, पण तशी इच्छा मध्ये येत नसेल तर...
युजी: जर ते तुमच्या शक्तीच्या बाहेर घडले, तर खेळ खलास. ते थांबवण्याचा, ती परिस्थिती बदलण्याचा तुमच्याकडे कसलाच मार्ग नसेल. त्यातून जाण्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. वास्तवावर प्रश्नचिन्ह उभे करून काहीच साधणार नाही. त्यापेक्षा तुमची ध्येये, तुमच्या श्रध्दा आणि मान्यतांवर प्रश्नचिन्ह उभे करा. त्यांच्यापासून तुम्ही मुक्त व्हायला हवे, वास्तवापासून नव्हे. तुम्ही विचारत असणारे हे बिनबुडाचे प्रश्न तुमची ध्येये आपोआप सुटली की गायब होतील. ते एकमेकांवर अवलंबून आहे. यातला एक दुसर्‍याशिवाय अस्तित्वात असू शकत नाही.
प्रश्न: हे एवढे दृश्यच भयंकर आहे. आम्हाला अराजक, पूर्णत: नाश ओढवण्याची भीती वाटते.
युजी: जर तुमच्या नाकातोंडात पाणी जात असेल, तर जाऊ द्या. तुम्ही बुडणार नाही. पण मी खात्री दिल्याने काय होणार आहे? मला वाटते, ते निरर्थक असेल. तुम्ही जे करताय ते तुम्ही करीत राहाल; त्यातील निरर्थकता तर तुमच्या लक्षातही येत नाही. मी तुम्हाला सांगतो, आशा आणि सातत्याच्या इच्छेतून होत असलेल्या गोष्टी करणे तुम्ही थांबवता तेव्हा, त्यासोबतच तुम्ही करीत असलेल्या सर्व गोष्टी थांबतात. तुम्ही तरंगत राहाल. पण तरीही तिथे आशा राहातेच; "कदाचित काहीतरी मार्ग असावा, कदाचित मी योग्यप्रकारे करीत नसेल." दुसर्‍या शब्दांत, कशावरही अवलंबून राहाण्याचा मूर्खपणा आपल्याला स्वीकारावा लागतो. आपल्या अगतिकतेचा सामना आपण करायलाच हवा.
प्रश्न: आमच्या प्रश्नांवर काहीतरी उपाय असेल असे वाटून घेण्याशिवाय काहीच हाती नाही. 
युजी: तुमचे प्रश्न तसेच राहातात ते तुम्ही शोधलेल्या चुकीच्या उपायांमुळे. उत्तरे जर तिथे नसतील, तर प्रश्नही तिथे राहू शकणार नाहीत. ते एकमेकांवर अवलंबून आहेत; तुमचे प्रश्न आणि त्यावरचे उपाय एकत्रच जातात. तुमचे प्रश्न मिटवण्यासाठी निश्चित उत्तरे तुम्हाला वापरायची असल्याने, ते प्रश्न तसेच टिकून राहातात. या सर्व धार्मिक आणि पवित्र लोकांनी, मानशास्त्रज्ञ, राजकारण्यांनी सांगितलेले असंख्य उपाय, ही काही खरीखुरी उत्तरे नव्हेत. तेवढे तरी निश्चित आहे. ती लागू पडणारी उत्तरे असती, तर प्रश्न आतापर्यंत शिल्लक राहिले नसते. ते फक्त आणखी कसून प्रयत्न करायला, आणखी ध्यान करायला, आणखी विनम्र व्हायला, तुमच्या डोक्यावर उभे राहायला आणि असल्याच अगणित गोष्टी करायला सांगतात. ते तेवढेच करू शकतात. या तथाकथित उत्तरांसोबतच शिक्षक, गुरू किंवा नेत्याने सांगितलेल उपायदेखील तेवढेच चुकीचे आहेत. ते काही प्रामाणिकपणे काम करीत नाहीत, फक्त बाजारात उभे राहून भिकार, तकलादू वस्तू विकत आहेत. तुमची आशा, भीती आणि भाबडेपणा दूर सारून त्या मूर्खांना बिझिनेसमन सारखी वागणूक दिली तर ते कोणताही माल देत नाहीत, आणि कधीच देऊ शकणार नाहीत हे तुम्हाला दिसेल. पण तज्ञ व्यक्तींनी दिलेल्या बोगस वस्तू तुम्ही विकत घेत जाता.. घेत जाता.
प्रश्न: पण पूर्ण क्षेत्रच एवढे गुंतागुंतीचे आहे की आत्मजागरण आणि ज्ञानप्राप्तीसाठी काळजीपूर्वक अभ्यास करून जीवन अर्पण केलेल्या व्यक्तींवर अवलंबून राहाणे आवश्यक वाटते. 
युजी: त्यांचे सर्व तत्वज्ञान प्रत्येकाच्या शरीरातच असलेल्या ज्ञानाच्या पासंगालाही पुरणार नाही. ते सांगत असलेली मानसिक कृती, आध्यात्मिक कृती, भावनिक कृती आणि भावना ह्या सर्व गोष्टी एकच एक सबंध प्रक्रिया आहे. शरीर हे अत्यंत हुशार आहे आणि या वैज्ञानिक आणी धार्मिक शिकवणुकीची त्याला टिकून राहाण्यासाठी आणि प्रजोत्पादनासाठी काहीच गरज नाही. जीवन, मृत्यू आणि मुक्तीबद्दलच्या तुमच्या सर्व रंगीबेरंगी कल्पना बाजूला सारा आणि शरीर अबाधीत, स्वरबध्दपणे कार्य करीत राहिल. त्याला माझी किंवा तुमची गरज नाही. तुम्हाला काहीएक गोष्ट करायची गरज नाही. अमरत्व, पुनर्जन्म किंवा मृत्यूबद्दलचे मूर्खपणाचे प्रश्न त्यानंतर तुम्ही कधीही विचारणार नाही. शरीर अमर आहे.  
प्रश्न: आम्हाला दिलासा, नियंत्रण मिळण्याची प्रत्येक शक्यता तुम्ही निर्दयपणे छाटून टाकलीत, दु:खापासून पळण्याची धूसर आशाही शिल्लक ठेवली नाहीत. स्वत:चा नाश करून घेण्याशिवाय काहीही हातात नाही असे वाटते. मग आत्महत्या का करू नये? 
युजी: तुम्ही आत्महत्या केलीत, तरी परिस्थितीत कसलाच फरक पडणार नाही. आत्महत्या झाल्यानंतर काही क्षणातच शरीर सडायला लागून, जीवनाच्या इतर प्रकारे संघटीत रूपांत रूपांतरीत होईल, त्यामुळे काहीही संपणार नाही. जीवनाला सुरूवातही नाही आणि शेवटही. मृत आणि सडणारे शरीरावत थडग्यातील मुंग्यांची भूक भागेल आणि सडणार्‍या प्रेतांतून मृदा समृध्द होणारी रसायने मिळून जीवनाच्या इतर रूपांचे पोषण होईल. तुम्ही तुमचे जीवन संपवू शकत नाही, ते अशक्य आहे. शरीर हे अमर आहे आणि "अमरत्व आहे काय?" वगैरे मूर्खपणाचे प्रश्न ते विचारत नाही. त्याला माहित असते की विशिष्ट रूपात समाप्त होऊन ते इतर रूपात टिकून राहिल. मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दलचे प्रश्न हे नेहमीच भीतीतून विचारले जातात. तुमच्या "आध्यात्मिक जीवनाचे" नेतृत्व घेतलेले ते नेते कधीच या गोष्टींबाबत प्रामाणिकपणे बोलणार नाहीत, कारण ते भीती, भविष्यातील जीवनाबद्दलचे अंदाज आणि मृत्यूच्या "गूढावर" स्वत:ची उपजिवीका चालवितात.
आणि तुम्ही, त्यांचे चेले, तुम्हाला काही खरोखर माणसाच्या भविष्याबद्दल घेणेदेणे नाही, तुम्हाला फक्त तुमच्या स्वत:च्या क्षुल्लक चिंता आहेत. मानवता, दया, करूणा आणि इतर गोष्टींबद्दल तासन तास बोलत राहून तुम्ही फक्त एक विधी पार पाडता. तुम्हाला रूचि असते ती तुमच्या स्वत:मध्ये, नसता तुमची भविष्यातील जीवने आणि तुमच्या सुनिश्चित मृत्यूबद्दल असले पोरकट प्रश्न उभे राहिले नसते.
प्रश्न: पण आमच्यापैकी बहुतेकांसाठी जीवन ही एक पवित्र गोष्ट आहे. आम्ही आमच्या पोराबाळांचे, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि आणखी युध्दे टाळण्यासाठी संघर्ष करतो..
युजी: तुम्ही सगळे माथेफिरू लोक आहात. तुम्ही जनन दरावरील नियंत्रणाविरोधात बोलता, अमूल्य जीवनाबद्दल आणि त्यानंतर बॉम्ब्ज आणि नरसंहाराबद्दल बडबडत राहाता. किती हास्यास्पद आहे. तुम्ही बॉम्बफेक, उपासमार, गरीबी आणि दहशतवाद यातून हजारो लोक मारत असतानाच तुम्हाला अजून जन्म न झालेल्या जीवनाबद्दल चिंता आहे. तुमची जीवनाबद्दलची "चिंता" फक्त त्यातून राजकिय मुद्दा उकरून काढण्यापुरतीच आहे. ती फक्त सुशिक्षित लोकांची एक चर्चा आहे. मला त्यात रूची नाही.
प्रश्न: होय, पण आमच्यापैकी अनेकजण हे पाहातात आणि या गोष्टी बदलण्याचीही त्यांची इच्छा असते. हा काही आमचा फक्त अहंकार नाही.
युजी: खरंच तुम्हाला त्यात रूची आहे? तुम्हाला मानवाच्या भविष्यात खरंच रूची आहे? राग, खरेपणा आणि काळजी या तुमच्या अभिव्यक्तींना माझ्याकडे काहीही किंमत नाही. ते फक्त विधी आहेत. तुम्ही बसता आणि बोलता, बस्स तेवढेच. तुम्ही बिलकुल चिडलेले नाही आहात. तुम्ही या क्षणी खरोखर चिडलेले असता तर हा प्रश्न तुम्ही स्वत:ला देखील विचारला नसता. तुम्ही अखंडीतपणे रागाबद्दल बोलत राहाता. रागावलेला माणूस, त्याबद्दल बोलणार नाही. त्या रागाच्या बाबतीत तो सामावून घेऊन शरीराने अगोदरच त्याची कृती करून टाकलेली असते. राग तिथल्या तिथे जळून जाऊन संपतो. तुम्ही काही करीत नाही; शरीर फक्त तो सामावून घेते. बस्स, तेवढेच. तुमच्यासाठी हे फारच जास्त असेल, त्यामुळे ताण येत असेल तर, कधीच धार्मिक माणसांकडे जाऊ नका. गोळ्या खा, काहीही करा, पण पवित्र धंद्यातून तुम्हाला मदत मिळण्याची अपेक्षा करू नका. तो वेळेचा अपव्यय आहे.
प्रश्न: तुम्ही मला सगळंच सोडायला लावताय, सगळाच त्याग..
युजी: जोपर्यंत तुम्हाला त्याग करण्यासारखे, सोडून देण्यासारखे काही आहे असे वाटेल तोपर्यंत तुम्ही हरवलेले आहात. पैशांचा आणि जीवनातील गरजांचा विचारही न करणे हा एक आजार आहे. जीवनाच्या मूलभूत गरजाही स्वत:ला नाकारणे हे दमन आहे. स्वत: ओढवून घेतलेल्या निष्कांचनपणामुळे तुम्हाला जागरूकता वाढविता येऊन ती जागरूकता सुखी होण्यासाठी वापरता येईल असे तुम्हाला वाटते. विसरा रे. जागरूकतेबद्दलच्या सर्व संकल्पना टाकून दिल्यानंतर आणि कॉम्प्युटरसारखे काम करणे सुरू केल्यानंतर तुम्हाला शांतता मिळेल. तुम्ही एक यंत्र असायला हवे, या जगात आपोआप कार्य करायला हवे, तुमच्या कृत्यांबद्दल ते होण्यापूर्वी, होताना किंवा झाल्यानंतर प्रश्नच पडायला नकोत.
प्रश्न: योगातील पध्दती, धार्मिक परित्याग किंवा नैतिक पोषणाचे मूल्य तुम्ही नाकारत आहात काय? माणूस निश्चितच यंत्रापेक्षा काहीतरी जास्त आहे.
युजी: सर्व नैतिक, आध्यात्मिक, तात्विक मूल्ये खोटी आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी व्यावहारिक मार्ग शोधणारे मानसशास्त्रज्ञ आता थकले आहेत आणि उत्तरांसाठी आध्यात्मिक धेंडांकडे वळायला त्यांनी सुरूवात केलीय. ते हरवले आहेत, आणि तरीही उत्तरे ही त्यांच्याकडूनच यायला हवीत, बुरसटलेल्या निरूपयोगी धार्मिक परंपरा आणि पवित्र धंद्यातून नव्हे.
प्रश्न: या सर्व परिस्थितीतून फक्त हताशा येतेय. मसिहा, महात्मा आणि प्रेषितांवर लोक अवलंबून राहिले यात काहीच आश्चर्य नाही.
युजी: या तथाकथित मसिहा आणि प्रेषितांनी जगात फक्त दु:ख मागे ठेवले आहे. एखादा आधुनिक मसिहा तुमच्यासमोर आला, तर त्याला तुम्हाला कसलीही मदत करता येणार नाही. आणि त्याला मदत करता आली नाही, तर कुणालाच मदत करता येणार नाही.
प्रश्न: एखादी अभिषिक्त व्यक्ती, उदाहरणार्थ एखादा तारणहार किंवा ऋषिला काहीच करता येण्यासारखे नसेल, तर धर्मग्रंथ म्हणतात त्याप्रमाणे, आपण "सत्य जाणून घ्यायला हवे आणि सत्य आपणा सर्वांना मुक्त करील."  
युजी: सत्य ही एक हालचाल असते. तुम्ही ते कैद करू शकत नाही, साठ्वू शकत नाही किंवा व्यक्त करू शकत नाही अथवा तुमचे हेतू साध्य करण्यासाठी वापरूही शकत नाही. ज्या क्षणी तुम्ही सत्य कैद करता, ते सत्य राहात नाही. माझ्यासाठी जे सत्य आहे ते कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला देता येत नाही. इथे असणारी निश्चितता दुसर्‍याकडे सोपवता येत नाही. याच कारणामुळे गुरूगिरीचा सर्व धंदा पूर्णत: एक फाजीलपणा आहे. नेहमीच हे असेच असत आले आहे, आत्ताच असे आहे असे नाही. पुरोहित, गुरूंना समृध्द करण्यासाठी तुम्ही काटकसर करता. तुम्ही तुमच्या मूलभूत गरजा दाबून टाकता आणि तो माणूस मात्र रोल्स रॉयस कारमध्ये फिरतो, राजासारखा खातो आणि महाराजासारखा वागवला जातो. तो आणि पवित्र धंद्यातील दुसरे लोक इतरांचा मूर्खपणा आणि भोळेपणावर पोसले जातात. असेच, राजकारणी सुध्दा माणसाच्या भुक्कडपणावर जगतात. सगळीकडे हे असेच आहे.
प्रश्न: तुमचा जोर नेहमीच नकारात्मक बाजूवर आहे, प्राचिन "नेति नेति" या दृष्टीकोनावर. आपला नैसर्गिक जन्मसिध्द हक्क असणारी स्थिती एखाद्याने शोधण्यासाठी धर्मग्रंथ, गुरू आणि अधिकारी व्यक्तींसह सर्व अतिरिक्त पसारा फेकून देण्याकडे तुमचा इशारा आहे ना?
युजी: नाही. मुक्तीसाठी गुरू, मंदिरे आणि पवित्र ग्रंथांपासून फारकत घेणे ही पूर्व अट असणे चमत्कारिक आहे. फक्त तुमच्या अडचणी, वेदना टाळण्यासाठी तुम्ही उत्तरे शोधत असता. जन्म झालेली प्रत्येक गोष्ट वेदनादायी आहे. ते तसे का आहे हे विचारण्याचा काहीही उपयोग नाही. ते तसे आहे. गुरू आणि अधिकारी व्यक्तींना नाकारून तुम्ही कसल्यातरी दैवी वेदना सहन कराल; वेदना सहन केल्याने तुम्हाला कसलीही आध्यात्मिक मदत मिळू शकणार नाही. कसलाही मार्ग नाही.
प्रश्न: पण आम्ही तुम्हाला एक अतिवादी, एक मानवद्वेष्टा म्हणून ओळखतो. तुम्ही फक्त माणसाच्या सध्याच्या हाल अपेष्टांवर टिकाच करीत नाहीय तर त्याच्या वेगळ्याच नियतीकडे निर्देश करताय, नाही?
युजी:  तुमच्या प्रश्नांसाठी एक उपाय आहे - मृत्यू. तुम्हाला ज्या मुक्तीमध्ये रूची आहे ती मुक्ती फक्त मरताना मिळेल. प्रत्येकाला शेवटी मोक्ष मिळतो, कारण मोक्षामध्ये नेहमीच मृत्यूची सावली आहे, आणि प्रत्येकजण मरण पावतो.
प्रश्न: पण मला वाटते तुम्ही कोणत्याही काव्यात्म किंवा काल्पनिक अर्थाने मृत्यूकडे पाहात नाही आहात. तुम्ही वर्णन करीत असणारा मृत्यू हा मानसिक, कल्पित किंवा अस्पष्ट रूप असलेला मृत्यू नाही तर खरोखर, वास्तविक शारीरिक मृत्यू आहे, होय ना?  
युजी: होय. तुम्ही मरता तेव्हा शरीर हे पसरलेल्या स्थितीत असते आणि कार्य करणे थांबवते, आणि तोच शेवट आहे. पण या बाबतीत शरीराने स्वत:ला कसेतरी पुनरूज्जीवीत केले आहे. आता ते नेहमीसारखे दररोजच होते; ही सर्व प्रक्रिया स्थिर होण्यासाठी अनेक वर्षे लागली. माझ्यासाठी आता जीवन आणि मृत्यू एकच आहेत, त्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. मी फक्त एवढाच इशारा देतो की तुमचे ध्येय असणारा मोक्ष खरोखर आला, तर तुम्ही मराला. शारीरिक मृत्यू होईल, कारण त्या स्थितीत जाण्यासाठी शारीरिक मृत्यू व्हायलाच हवा. तुम्हाला मजा वाट्ते म्हणून तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवत खेळ खेळला जातो. पण तुम्ही जास्तवेळ श्वास रोखून ठेवला तर मरण ओढवते.
प्रश्न: त्यामुळे आपल्या ध्यानाचा विषय करून, त्याला अशा काल्पनिक, गूढ प्रकारे मानून मृत्यूबद्दल जागरूक व्हायला हवे. नाही का?
युजी: त्या स्थितीचे ध्यानातील पूर्ण जागरूकता असलेली स्थिती म्हणून वर्णन करणे कल्पित, निरर्थक गोष्ट आहे. जागरूकता! स्वत:ला आणि इतरांना मूर्ख बनवण्यासाठी वापरण्यात येणारी किती चमत्कारिक युक्ती! तुम्ही प्रत्येक पावलाबद्दल जागरूक होऊ शकत नाही, झालात तर तुम्ही फक्त आत्मकेंद्रीत आणि बावळट बनता. जहाजचालक असणारा एक माणूस मला एकदा भेटला. तो "निष्क्रिय जागरूकता" याबद्दल वाचत होता आणि त्याने तसे प्रत्यक्ष वागण्याचा प्रयत्न केला. तो चालवत असलेल्या जहाजाच्या, त्याने आयुष्यात पहिल्यांदाच चिंध्या केल्या. आपोआप चालत राहून तुम्ही प्रत्येक पावलाबद्दल जागरूक राहाण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला वेड लागेल. ध्यानाच्या पायर्‍या कसल्या शोधताय? जेवढे आहे तेवढे पुरे. ध्यानस्थ स्थिती सर्वात खराब आहे.
प्रश्न: पण आपण पवित्र मानलेली प्रत्येक गोष्टच आपल्याला सोडून देता येत नाही.
युजी: निश्चितच, मला सोडून देऊ शकतो; तो फक्त रोमॅण्टीक पसारा आहे. मी तुम्हाला दिलेला कोणताही उपाय तुमच्या शोधाचा भाग बनेल; म्हणजेच आणखी रोमॅण्टीक पसारा. त्यामुळेच मी कधीच सांगताना थकत नाही की माझ्याकडे विकण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही, एखादी चांगली पध्दतही नाही ज्यातून तुम्हाला तुमचा शोध पुढे चालु ठेवता येईल. मी त्या पूर्ण शोधाचीच वैधता नाकारतो. तुम्हाला इथे काहीही मिळणार नाही. इतर कुठेतरी तुमचे नशीब अजमावून पाहा.
प्रश्न: पण निश्चितच तुम्ही पण एक माणूस आहात आणि मानवतेच्या कामी पडू ईच्छिता, दया म्हणून तरी?
युजी:  तारणहार म्हणून माझी कुणी निवड केलीय? तुमची सेवा करू इच्छिणारे असंख्य संत, प्रेषित आणि त्राते तुमच्याकडे आहेत. आणखी एकाची भर कशाला टाकता? येशू म्हणाला, "वाजवा म्हणजे दार उघडेल. माझ्या मागून या." काही कारणामुळे मी ते करू शकत नाही. आपण बरेच रान पळालो आहोत. आपण हा संवाद उद्या पुढे चालू ठेवला तर बरे होईल.
प्रश्न: मग उद्यापर्यंत..
युजी: धन्यवाद.


( मराठी अनुवाद - यशवंत कुलकर्णी  )

३ जानेवारी, २०११

बाबूकाका

डोक्याच्या घेरावर बारीक होत गेलेला पोलीसकट, पांढरे होत चाललेले केस, तरूणपणीच्या शम्मी कपूरसारखाच चेहेरा आणि अंगयष्टीही तशीच, अंगात सफारी किंवा तसलाच साहेबी वाटणारा पोषाख, हातात एक लहानशा आकाराची ब्रीफकेस असे काहीसे वर्णन करता येईल असा माणूस एसटीतून उतरण्याची वाट पाहात खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट घातलेला एक पोरगा बसस्टॅण्डवर कितीतरी वेळापासून थांबलेला असे. ते त्याचे बाबूकाका होते. बाबूकाका त्याचे आजोबा लागत असले तरी घरातील इतर सर्वजण त्यांना बाबूकाकाच म्हणत असल्याने त्याच्यासाठीही ते बाबूकाकाच होते. घरातील कुणीतरी बाबूकाका आज/उद्या येणार असं बोलत असताना ऐकलं की तो शाळा सुटताच बाबूकाका यायची वाट पाहात स्टॅण्डवरच थांबून राही. कधीकधी बाबूकाकासोबत रमाकाकू सुध्दा यायच्या. अशावेळी मात्र त्यांचा गडी चांदपाशासुध्दा गाडीबैल बसस्टॅंडजवळच्या एखाद्या झाडाखाली सोडून तिथेच बीडी फुंकत बसलेला दिसे. एस्ट्यावर एस्ट्या थांबत आणि त्यातून बाबूकाका-रमाकाकू बाहेर न पडताच निघुन जात. मग साडेसहा पावणेसात वाजता चांदपाशानं गाडी जुपून गावाकडे वळवली की तो पोरगा मागून चालत्या बैलगाडीत उडी मारून गाडीत चढे आणि चांदपाशाजवळ जाऊन बसे.
"य्या:!! ...हूं॒:!!! ... सांगायचं नाही व्हयं गाडी थांबव म्हनून? पल्डं, र्‍हायलं म्हंजी? नसलेली बला.."
बैलगाडीचा कासरा सांभाळताना खरोखर आलेला राग त्या हूं:!!! मधून दाखवत त्या पोराकडं पाहून चांदपाशा म्हणे.
"काही पडत नाही मी चांदपाशामामू.. ते जाऊ द्या.. बाबूकाका कधी येतो म्हणले होते?"
"बाबूशेट आज पंधरादी जालन्याला गेले व्हते तव्हा ह्या सुक्कीरवारी यतो म्हनून निरोप देल्ता... आजूक पत्ता नाई... येतेन उद्या.. सनवार आन रैवारी सुट्टीबी अस्ती.."
"हो!!!! उद्या बाबूकाका येणारच मग.. उद्या शनीवार.."
मग तो पोरगा शनीवारी दुपारी चार वाजता पुन्हा एकदा स्टॅण्डवर जाऊन बसे. बाबूकाका आणि रमाकाकूची खूप वेळ वाट पाहून कंटाळून जाई. आणि अचानक कुठल्यातरी एसटीतून बाबूकाका आणि डोक्यावर पदर घेतलेल्या रमाकाकू उतरताना दिसत. चेहेर्‍यावर खूप मोठं हसू घेऊन तो एस्टीतून उतरलेल्या बाबूकाकाच्या दिशेनं पळे.
"ह्हे:!!!!! पप्पुशेठ.. गाडीलेट.. गाडीचा नंबर एटीएट!!! ..." बाबूकाका त्या पोराकडं पाहून ओरडत.
"तुमी तर कालच येणार होता... चांदपाशा न मी वाट पाहून घरी वापस गेलो काल..."
"येणार होतो रे.. पण सुट्टीच मिळाली नाही.."
तेवढ्यात गावात कोतवालकी करणारा देवर्‍या कुणीही न सांगता पुढे येऊन काकांची ब्रीफकेस हातात घेई आणि रूमालाची चुंबळ डोक्यावर ठेऊन काकूची मोठी सूटकेस डोक्यावर घेऊन घराकडे चालू लागे.
मग बाबूकाकाच्या हातात हात घातलेला तो पोरगा, रमाकाकू असे सगळेजण पायीपायीच घराकडे चालू लागत. बाबूकाकासोबत हातात हात घालून चालताना त्या पाचवी सहावीतल्या पोराला खूप मजा वाटे. रस्त्यात भेटणारे, धोतर, टोपी घातलेले लोक मध्येच थांबून बाबूकाकाला रामराम! असं म्हणून रामराम घालत. बाबूकाकापण रामराम! रामराम! म्हणून प्रतिसाद देत. असं होता होता मारवाड्याचं दुकानं येई आणि तिथं बाबूकाका मुद्दाम थांबून दुकानात गिर्‍हाईकांच्या मालाची पट्टी करीत उभ्या असलेल्या बाबूशेठला "जयगोपाल शेटजी!!" म्हणत. ते ऐकताच आडदांड आकाराचे बाबूशेठ चष्यातून वर पाहात बोलत -
"अरे! तुम्ही आलात? चांदपाशा आला नाही का गाडीबैल घेऊन?.. आज कापूस वेचायला बाया लावल्यात.. तिकडं गेला असल.."
"हो, तुम्हाला बोललो होतो शुक्रवारी येईल म्हणून.. पण रजाच मिळाली नाही.. आज शेवटी निघालोच.. येतो रात्री निवांत.." असं म्हणून बाबूकाका पुढे चालू लागत.
घराकजवळ येताच त्या पोराची आजी हातात पाण्यानं भरलेला तांब्या आणि भाकरीचा तुकडा घेऊन थांबलेली दिसे. शेजारच्या ओट्यावरच सामान वाहून थकल्याने हाश्श..हुश्श करत देवर्‍या बसलेला.
"देवर्‍यानं सामान आणून टेकवलं कीच मी म्हणले, माय‌‍ऽऽ बाबू राव आले जणू... रमा, किती खराब झालात गं.." असं म्हणीत आजी बाबूकाका आणि रमाकाकूवरून भाकरीचा तुकडा ओवाळून फेकी आणि चूळ भरायला पाण्यानं भरलेला तांब्या हातात देई.
बाबूकाका मोठ्या दारातच चूळ भरून पायावर पाणी घेत आणि लगेच वाट पाहात उभ्या राहिलेल्या देवर्‍याच्या हातावर तिथल्या तिथेच दहा रूपयाची कडक नोट ठेवत. डोक्याला हात लावत देवर्‍या पुन्हा बसस्टॅण्डकडे चालू लागे. पटकन मग तो लहानसा पोरगा त्याच्या शाळेच्य वह्या बाहेर काढी आणि बाबूकाकाला दाखवायला निघे -
"काका, हे बघा, मला आता इंग्लिश वाचता येतंय...."
"हो? पाचवीलाच इंग्लीश? दाखव.." म्हणून काका त्या पोराची वही हातात घेत. तो पोरगा वही काकांच्या हातात देऊन इंग्रजीचं पुस्तक हातात धरून धडा वाचायला सुरूवात करी.. निघोज इज ए वंडरफुल प्लेस सिच्युएटेड ऑन दी बॅंक्स ऑफ रिव्हर घोड.. रिव्हर घोड हॅज क्रिएटेड मेनी पॅथहोल्स इन दी रॉक्स सराऊंडींग इट्स बोथ साईड्स..."
"ए‌ऽऽऽ इथं हे मराठीत लिहीलेलंय..." काका म्हणत..
"हो.. मला दादांनी आधी मराठीत इंग्रजी वाक्यं लिहून वाचायला शिकवलंय.." तो पोरगा त्याची बाजू सांभाळी.
"तुझे दादा काही ती जुनी पध्दत सोडणार नाहीत.. कुठे गेले दादा..?" बाबूकाका विचारत. हे दादा म्हणजे बाबूकाकाचेच सावत्र पण मोठे भाऊ.
"गायवाड्याकडं गेले असतेल.." तो पोरगा बाबूकाकाला सांगत असे.
"पप्प्या, जा बोलावून आण तुझ्या दादाला.. बाबूराव आले म्हणाव.." त्याची आजी त्याला म्हणे.
बाबूकांच्या हातात वाफाळलेल्या चहाची कपबशी देत आजी म्हणे. तो पोरगा गायवाड्याकडं पळे.
त्या पोरासाठी बाबूकाका म्हणजे नेहमीच लांबच्या गावाहून येणारं अत्यंत जवळचं, अत्यंत लाड करणारं आणि आकर्षण वाटणारं माणूस असे. बाबूकाकाबद्दल गावातल्या प्रत्येक माणसाला आदरयुक्त भीती असे, प्रत्येक माणूस कधी ना कधी त्यांना सल्ला विचारायला येत असे. बाबूकाका हे पुणे, जालन्याच्या पोलिसांच्या शाळांमध्ये पोलिसांना कायदे शिकवणारे वकील होते. पाचवीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत जालन्याच्या आर.पी.टी.एस. मध्ये बाबूकाकांकडे राहायला तो मुलगा जेव्हा गेला, तेव्हा गेट भोवती आणि घराभोवती बंदुका हातात घेऊन उभे असलेले पोलिस पाहून त्याला बाबूकाका हे कुणीतरी खूपच मोठे असल्याबद्दल खात्रीच पटली होती.
बाबूकाका म्हणजे कायदेकानू कोळून प्यालेला माणूस. कधीही कुणासमोरही खाली पाहाणार नाही. झालेच तर लोकांवर उपकार करतील, पण फुकट कुणाकडून ग्लासभर पाणीसुद्धा घेणार नाहीत. बेकार हिंडणार्‍या पोरांना काहीतरी किल्ल्या वापरून पोलिस कॉन्स्टेबलची नोकरी द्यायचा अधिकार हातात असला तरी, कायद्यानं आखलेल्या मर्यादेबाहेर जाऊन कधी कुणावर उपकार केला नाही. शिकायचं आहे ना, मग शिका - पैसा लागला तर मी देतो, पण परिक्षा पास होऊनच नोकरीत या - वशिल्याचे फालतू धंदे माझ्याच्यानं होणार नाहीत - हे त्यांच्याकडं नोकरीकरीता येणार्‍या गावातल्या तरूण लोकांना स्वच्छ सांगणं असे. त्यांच्या आश्रयानं राहून अनेक होतकरू पोरं फौजदार, सरकारी वकील या हुद्द्यावर गेली. आणि जी जावू शकली नाहीत, ती "वकील लई खडूस हाये.. साधा कॉन्स्टेबल म्हणूनपण कधी कुणा बेकार पोराला लावणार नाही" म्हणू लागली.
बाबूकाका आणि रमाकाकू येत तेव्हा न चुकता त्या मुलासाठी खार्‍या शेंगदाण्याच्या पुड्या आणत, दिवाळीत हजार रूपयांचे फटाके विकत घेऊन देत, कपडे, पुस्तके आणि तसलाच अनेक प्रकारचा लाड पुरवत. पण या बाबूकाका आणि रमाकाकूंना स्वत:चा मुलगा किंवा मुलगी कुणीही नव्हते. ते स्वत:च्या पुतण्याच्या, भावाच्या मुलांना असे प्रेम लावत. आणि मग त्या खेड्यात "आता बाबू वकील अमुक च्या मुलाला दत्तक घेणार!!" अशी अफवा उठे. बाबूकांकांचा दरारा, चार औतं, पाच-सहा गड्यांचा बारदाना आणि पन्नास-साठ एक्कर जमीन पण त्यांच्या वंशाला नसलेला नसलेला दिवा हाच एक गावातल्या लोकांसाठी चर्चेचा विषय असे.
गावातले लोक मध्येच कधीतरी त्या मुलाला पकडून म्हणत -
"पप्पुशेठ, नीट र्‍हा, शिका.. बाबूमालक तुमाला काई कमी पडू देणार न्हाईत.. सोनं होईल आयुष्याचं.." त्या पाचवी सहावीतल्या पोराला त्यातलं काही कळत नसे.
मग बाबूकाका चहापाणी आटोपून ओट्यावर बसत. तेवढ्यात शेताकडून कापसाच्या भोतांनी लादलेली बैलगाडी घेऊन चांदपाशा येई. आल्याआल्याच "मालक आले जणू!" म्हणून पटकन कापूस चार खणात टाकून बाबूकाका या त्याच्या मालकांसमोर येऊन बसे.
"वाट पाहून चार वाजता गेलो मी गारूडात... कापसाला बाया लावल्यात आज.." असं सांगून बैलगाडी घेऊन बसस्टॅण्डवर हजर नसल्याबद्दल सारवासारव करी.
"देवर्‍या होता बसस्टॅण्डवर.. आम्ही आलो पायीपायी.. बाबूशेठनं आत्ताच दुकानात सांगितलं कापसाचं.. किती होईल यंदा कापूस?" बाबूकाका चांदपाशाला विचारत.
"अं! छातीइतकं हाये एक एक झाड आवंदा.., ईस पंचीस कुंटल उतार होईनच...तूर बी तशीच हाये.. उद्या येढ्याला तुमीच पाहा.." चांदपाशा म्हणे.
मग ओट्यावर बाबूकाका, चांदपाशा आणि रानातून आलेल्या गड्यांच्या गप्पा होत त्यावेळी वाड्यासमोरच्या आवारात रातकिडे चमकू लागलेले असत आणि बेडकांची डरांवऽऽ डरावं‍ऽऽ सुरू झालेली असे. गड्यांसोबत बाबूकाकांचा पुन्हा एकदा चहा होई.
"जा आता घरी, भाकरी खाऊन घ्या..." शेवटी बाबूकाका गड्यांना सांगत आणि जेवणखाण आटोपून बाबूशेठ्च्या दुकानाकडं निघत. तिथे त्यांच्या दोस्तांचा जमाव रात्रीच्या रमीच्या डावाची जमवाजमव करीत बाबूकाकांची वाट पाहात असे.
सकाळी "बाबू काल रात्री अडीच वाजता आला घरी" असं दादा म्हणत असताना ऐकू येई आणि तो पोरगा जागा होई.
मग चार सहा दिवस असेच बाबूकाकासोबत, रमाकाकूसोबत गप्पा करताना, त्यांचं बोलणं ऐकताना कसे वार्‍यासारखे भुर्रर्र उडून जात.
"वन्सं, माझा सपीटाचा उंडा किती काळा पडलाय हो... पप्पुशा अभ्यास करतोस की नाही नीट?" रमाकाकू आजीला बोलत असताना त्या पोराला जवळ घेत.
"गंगंच्या काठंचं वारं रमा इथं, इथं कुठं तुमच्या जालन्यासारखं मशीनीतून येणारं वारं? घेऊन जा त्याला जालन्याला... महिन्यात सपीटासारखा दिसल" आजी रमाकाकूला म्हणे.
मग गुरूवार येई आणि गुंजाला निघायची तयारी होई. तो मुलगा आणि त्याची बहीण नमी सगळ्यात अगोदर तयार होऊन गाडीत चढत.
.
.
.
.
.
.
.
असेच दिवस, वर्षे उलटत गेली. तो मुलगा कळता होऊ लागला. चुकत माकत शिकला, चार अक्षरं गिरवू लागला. पाखरांच्या पिलांना पंख आले की ती जास्त काळ घरट्यात थांबत नाहीत. तो ही कुठंतरी दूर उडून गेला. या काळात बाबूकाका रिटायर झाले. गावाकडे राहायला आले. आता इतकी वर्षं शहरात राहिलो, आता गावातच राहून स्वत: शेती पाहाणार म्हणाले - काही वर्षे गुंजाच्या वार्‍या करीत स्वत: शेती पाहिलीसुध्दा. एवढा सरकारी वकील माणूस पण खेड्यागावात राहून शेती पाहातोय, गावची मोडकळीला आलेली मंदीरं पुन्हा उभारतोय हे पाहून गावातल्या लोकांना बाबूकाकांचं आणखीनच अप्रूप वाटू लागलं.
तशी बाबूकाकाची प्रकृती पहिल्यापासूनच तोळामासा. थोडं काही झालं की बाबूकाकांची तब्येत खालावत असे. गावचं राहाणं, लोकांकडून होणार्‍या दत्तकाबद्दल होणार्‍या खुदर्‍याबुदर्‍या यांत बाबूकाकांनी त्याबद्दल काहीच ठरवलं नाही. स्वत:च्या दुसर्‍या सख्ख्या भावाची मुलं, मुलीही आता कळते सवरते झाले होते. बाबूकाकांनी त्यांना शिकवलं, डॉक्टर, प्राध्यापक केलं. जालन्यात असताना भावाची मुलगी स्वत:कडे शिकायला ठेऊन घेतली - तिला पोटच्या पोरीसारखाच जीव लावला. तिचं लग्न लाऊन दिलं - आणि तेव्हापासूनच त्यांची तोळामासा प्रकृती दर सहा महिन्यांना आणखी ढासळू लागली. अन्न समोर आलं की उलट्या होऊ लागल्या.
असाच आजार सरकारी वकीलाची नोकरी लागलेली असताना त्यांना झाला होता असं दादा कित्येक वेळा बोलताना त्या पोराला आठवे. पण तो काळ जुना होता. तेव्हा गुंजाचे महाराज हयात होते. ते महाराज दत्तकृपा असलेले नैष्ठीक ब्रम्हचारी होते. बाबूकाका त्यांच्या संस्थानातले मानकरी होते. रमाकाकूंनी महाराजांसमोर पदर पसरून भीक मागितल्यानंतर त्यांनी बाबूकाकांना जगवलं होतं. कुणाच्याही घरचं अन्न खाऊ नका, कुणाचा पैसा खाऊ नका, नेकीनं सरकारची चाकरी करा अशा अटी घालून त्यांनी बाबूकाकांना जीवनदान दिल्याचं खुद्द बाबूकाकाच मानत होते. महाराजांनी सांगितलेले नियम आणि गुरूवारची दत्तमहाराजांची वारी व रोजची पंचपदी, पाठ चुकवत नव्हते.
पण आता काळ बदलला होता. वय वाढल्यानंतर पुन्हा प्रकृतीच्या त्याच तक्रारी बाबूकाकाला सतावू लागल्या. आता गुंजाचे महाराजही नव्हते. डॉक्टर झाले, वैद्य झाले, महिना महिना हॉस्पीटलमध्ये राहून झालं. चार आठ महिने बाबूकाकांना बरं वाटे आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन.
तो पोरगा बाबूकाकांना म्हणे -
"काका, तुम्ही कशाला त्या गावात राहून शेती पाहाण्याच्या फालतू भानगडीत पडता.. चांगला बंगला घ्या, कार घ्या.. शहरात राहा.. काय पडलंय त्या शेतीत आणि हवीय कशाला आता ती शेती? सरळ विकून टाका.. आजारी पडलात तर कार करून शहरापर्यंत यावं लागतं... तुम्ही नकाच राहू तिथं.." बाबूकाका हो! हो! म्हणत पण ऐकत नसत.
शेवटी महिनाभर बाबूकाकांनी अन्न सोडलं. सगळे डॉक्टर, वैद्य झाले. जुन्या महाराजांच्या जागेवर आलेल्या महाराजांनी दिलेला अंगारा, तीर्थ वगैरे झाले.. पण बाबूकाकांची अन्नावर वासना होईना. डॉक्टरांनी आठ दिवस ठेऊन घेतले आणि एके दिवशी प्रकृतीत फरक पडल्यावर काहीही शारीरिक आजार नाही, अन्न खायला लागा म्हणून डिस्चार्ज दिला. सख्ख्या भावाचा पुतण्या, सावत्र भावाचा पुतण्या, बायको त्यांचा तो पोरगा दिवसरात्र हॉस्पिटलमध्ये राहिले. डिस्चार्ज मिळून गावाकडे गेल्यावर, शेवटी बाबूकाकांनी नेहमीच्या शिरस्त्यानुसार गुंजाच्या वारीला न्यायचा हट्ट धरला. अन्न जात नव्हतंच. तिथं गेले, रात्रीचे बारा वाजेपर्यंत गुरूवारची पंचपदी झाली, सकाळी काकड आरती झाली..
बाबूकाका सोबत असलेल्या, डॉक्टर पुतण्याला म्हणाले -
"अरे, दत्त महाराजांचं तीर्थ आणि अंगारा दे..."
ते झालं. सकाळी साडेसहाला बाबूकाकांचा श्वास थांबला आणि अन्नावाचून जर्जर झालेला देह शिल्लक राहिला. प्रतिगाणगापूर मानल्या जात असलेल्या गुंज गावात बाबूकांकांनी देह ठेवला.
बाबूकाका गेले आणि त्या पोराला हे सगळं आठवलं...
गावी जाणार्‍या रेल्वेमध्ये हे पोरंगं का रडतंय ते अनोळखी प्रवाशांना कळत नव्हतं